जैवविविधता हेच खरे भांडवल
वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी गवताळ परिसंस्था जपणे आवश्यक
मानवाच्या सुमारे ८० टक्के गरजा गवतवर्गीय वनस्पतींमधून पूर्ण
भवताल टॉक या पर्यावरणीय संवाद कार्यक्रमाचे आयोजन
पुणे: “मानवाचं खरं भांडवल ही जैवविविधता आहे. अन्ननिर्मिती, औषधनिर्मिती आणि मानवी जीवनातील वनस्पतींची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मानवाच्या सुमारे ८० टक्के गरजा गवतवर्गीय वनस्पतींमधून पूर्ण होतात. मृदाक्षय रोखण्यासाठी आणि वाघासारख्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी गवताळ परिसंस्था जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. यादव यांनी केले.
पुणे शहरात भवताल टॉक या पर्यावरणीय संवाद साधणाऱ्या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्याशी विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी सहायक समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र, जैवविविधता, गवताळ परिसंस्था आणि संवर्धन यावर सखोल व अभ्यासपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित घोरपडे यांनी मांडले. त्रिलोक खैरनार यांनी डॉ. यादव यांची ओळख करून देत संवाद सत्राची सुरुवात केली. डॉ. यादव यांनी आपल्या शैक्षणिक व संशोधन प्रवासाचा आढावा घेताना शिवाजी विद्यापीठातून पदवी शिक्षण, मुंबईच्या रुईया कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण आणि यूजीसी फेलोशिपवर पीएच.डी. करण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय याविषयी अनुभव कथन केला. “शिक्षणात पैशांचा प्रश्न नसतो, जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते. मदतीचे हात आजूबाजूला नेहमीच असतात,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वनस्पतीशास्त्रातील टॅक्सोनॉमी या शाखेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी पदव्युत्तर शिक्षणाच्या काळातील एक अनुभव सांगितला. गावी असताना पठारावर सापडलेल्या एका वेगळ्या वनस्पतीच्या अभ्यासातून ‘वायतुरा’ या नव्या प्रजातीचा शोध लागला आणि याच घटनेतून त्यांच्या संशोधन प्रवासाला दिशा मिळाली. आतापर्यंत डॉ. यादव यांनी ८१ नवीन वनस्पती प्रजातींचा शोध लावला असून १९ प्रजातींना त्यांच्या नावावरून नामकरण करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठातील पश्चिम महाराष्ट्रातील स्कूल ऑफ टॅक्सोनॉमी उभारण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
टॅक्सोनॉमी ही जीवशास्त्राची मूलभूत शाखा असूनही रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे विद्यार्थी या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “आपण समाजामुळे शिकतो, त्यामुळे समाजाला काहीतरी परत देणं आपलं कर्तव्य आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांनी संवर्धनाच्या कार्यात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि वनस्पतींच्या छायाचित्रांचे सादरीकरण करण्यात आले. भवतालच्या दर्शना खुंटे, सागर लंके आणि निवेदिता कुंभार यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






