पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण (फोटो- istockphoto)
पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण
एमपीसीबी चाचणीत सर्व फटाके नापास
गोळीबार मैदानाशेजारील धोबी घाट येथे घेण्यात आली चाचणी
पुणे: दिवाळीच्या काळात वायू आणि ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पर्यावरणस्नेही फटाके तयार करण्यात आले. मात्र हे फटाकेही ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे ठरले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) नुकत्याच झालेल्या चाचणीत एकाही फटाक्याने निर्धारित मर्यादा पाळली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोळीबार मैदानाशेजारील धोबी घाट येथे ही चाचणी घेण्यात आली. २० फूट अंतरावर आवाज मोजला असता पाचशेच्या लडीने सर्वाधिक ९९.३ डेसिबल, सिंगल शॉट फटाक्याने ८७.३ डेसिबल, लवंगीच्या २४ लडींनी ८५.३ डेसिबल, सुतळी बॉम्बने ७८.१ डेसिबल, सद्दाम ॲटमबॉम्बने ७६.३ डेसिबल, लक्ष्मी फटाक्याने ७१.९ डेसिबल, रॉकेटने ७२ डेसिबल, तर रंगीबेरंगी पावसाने ६६ डेसिबल इतका आवाज निर्माण केला.
निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल ही मर्यादा असून, सर्व फटाके या मर्यादेपेक्षा अधिक आवाज करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फटाके वाजविणाऱ्यांवर कारवाई करायची की फटाके बनविणाऱ्या कंपन्यांवर, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढते ध्वनिप्रदूषण पक्षी, प्राणी आणि मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज अधिक भासू लागली आहे.
‘या चाचणीमुळे फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवून पुढील उपाययोजना ठरविण्यात येतील’
– बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी
Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?
दिवाळी सण पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असला तरी फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि विषारी धुरामुळे हा सण निसर्गातील सजीवांसाठी ‘कर्दनकाळ’ ठरतो आहे . शांत, निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणाऱ्या पक्ष्यांना मोठ्या आवाजाची सवय नसते. दीपोत्सव सुरू होताच सर्वत्र फटाक्यांचा गडगडाट सुरू होतो. त्यातून निर्माण होणारे ध्वनी व वायू प्रदूषण प्राणी – पक्ष्यांच्या जीवावर बेतते.
झाडांवर विश्रांती घेत असताना अचानक फटाके फुटल्याने पक्षी घाबरून उडतात. अंधारात दिशाभूल होऊन इमारतींना, तारा किंवा झाडांना धडकतात आणि गंभीर जखमी होतात. काही मृत्युमुखी पडतात, तर अनेक बेघर होतात. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो आणि काही पक्षी बहिरे होतात. हवेतील सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारखे घातक वायू त्यांच्या श्वसनसंस्थेत जाऊन श्वास घेण्यास त्रास निर्माण करतात, असे पशुवैद्य डॉ. कुणाल मुनाळे यांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले.