परवानगी शिवाय आंदोलन करणे पडले महागात; 38 जणांवर गुन्हा दाखल (Photo : iStock)
पिंपरी : पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणे आंदोलकांना महागात पडले आहे. दापोडी येथील शितळा माता चौकात 38 जणांनी बेकायदेशीरपणे आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे कोषाध्यक्ष सुनील किसन उबाळे, जॉर्ज मदनकर, सागर केदारी, रिबेका शिंदे, दिलीप ठोंबरे, सतीश पटेकर, नितीन गायकवाड, विजय गायकवाड, मनोज कमलाकर मिसाळ, बन्सामीन काळे, फ्रान्सिस गजभिव, मंगेश बोधक, ग्लोरी ससाणे, मायकल गजनाडार, फॅबियन अण्णा सॅमसन, राजेश नायर, जॉन्सन पावलस, प्रशांत केदारी, डेव्हिड काळे, डेव्हिड पहेलवान, पवन गायकवाड आणि इतर 15 ते 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी न घेता 22 जून रोजी आंदोलन केले. झेंडे, लहान बोर्ड हातात घेऊन घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शितळा माता चौक दापोडी येथे आंदोलन केले. या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन
दुसरीकडे, राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कळंबोली वसाहतीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात व मराठी भाषेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाचा हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा देखील या वेळी मनसैनिकांनी दिला.