तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये उपनगराध्यक्षपदी गणेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश काकडे यांच्याकडे बिनविरोध सोपविण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आगळे, बाबा मुलानी आणि भाजपचे सूरज सातकर यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
हे देखील वाचा : पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का? मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी
नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती झाली असून, त्यातून भाजपचे संतोष हरिभाऊ दाभाडे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे १० आणि १ अपक्ष, असे मिळून २८ नगरसेवक निवडून आले होते.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेस मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, गटनेत्या हेमलता खळदे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, भाजपचे गटनेते इंदरमल ओसवाल यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
हे देखील वाचा : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?
निवडीनंतर आमदार सुनील शेळके तसेच विविध पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. काकडे यांनी यापूर्वी तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेते आणि उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली असून, महायुतीच्या ठरावानुसार अडीच वर्षांनंतर त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी शहरहितासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी येत्या काही महिन्यांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कडक लक्ष ठेवले जाईल, असे नमूद केले.






