बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेत मोठ्या गतीने संसर्ग वाढत आहे. ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. आम्ही विविध विभागांना सांगत होतो, राज्यात दुसरी लाट असताना आम्ही तयारीचे आदेश दिले होते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलेले आहे. दुसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत, त्यांनी ती वाढवावी.
यंदाच्या अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी जाहीर केला आहे. यामध्ये अनेक ग्रामीण व प्राथमिक रुग्णालये मंजूर करण्यात आली असून, यासाठी चार हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची कामे वेळेत सुरु करण्यासाठी बांधकाम विभाग व संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील २० टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. आमदार निधीतून ४ कोटीपैकी १ कोटी निधी आरोग्यासाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बिनविरोध करण्याची आमची भूमिका होती. मात्र, काही जणांकडून अपप्रचार करण्यात आला. हवेली तालुक्यात आमच्याच विचाराचे दोघेही आहेत. संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र, सर्व जागा बिनविरोध करण्यास यश आले नाही. गेली ३० वर्षे बँक चांगली चालवण्याचे काम आम्ही करत आहोत. चांगलं काम असेल तर लोक निवडून देतील. कोणी जातीयवाद करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी
मुंबई महापालिकेच्या योजनेत झालेल्या १८४४ रुपयांच्या कथित घोटाळा झाला असल्याच्या आरोपासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यपाल ही महत्वाची व्यक्ती त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही सातत्याने खबरदारी घेतोय. सातत्याने लोकायुक्तांकडे तक्रारी येतात. मात्र, यामध्ये तथ्य असेल तर वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल, तथ्य नसेल तर त्यांच्याही लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने तक्रारी करतात.