पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार (फोटो- istockphoto)
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होणार असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे. ’’
Exciting news for Punekars!
Starting tomorrow, Tuesday, December 24, 2024, all international flights from Pune International Airport will operate from the newly inaugurated terminal. All necessary technical procedures have been completed. Today conducted a review of the… pic.twitter.com/jCw83DukKs
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 23, 2024
‘पुणे विमानतळाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध’
‘‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
पुणे विमानतळावर केवळ ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार चहा, पाणी
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरुन प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता कमी दरात चहा, कॉफी व पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे. यासाठी एक स्टॉल राखीव ठेवण्यात येणार आहे. यातील पदार्थांचे दर टर्मिनलमधील अन्य स्टॉलच्या तुलनेत अत्यंत कमी असणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे २०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६० ते ८० रुपयांना विक्रीस आहे. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरु केली आहे. मात्र टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. जुन्या टर्मिनलमध्ये एका स्टॉलवर कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध आहे. नवीन टर्मिनलवर मात्र एकाही स्टॉलवर कमी किमतीत पदार्थांची विक्री केली जात नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे.
हेही वाचा: Pune Airport: प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावर केवळ ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार चहा, पाणी
विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर चहा व पाण्याची बाटली २० रुपयांना देण्याच्या विचारात आहे. यासाठी एक छोटा स्टॉल सुरु होणार आहे. सध्या नवीन टर्मिनलवर १२० विमानांची वाहतूक होते. काही दिवसांत ती वाढणार आहे. त्यामुळे १० ते १५ दिवसांत नवीन स्टॉल प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची आशा आहे.