File Photo : Gopal-Tiwari
पुणे : घटनात्मक पदांवरील सत्ताधाऱ्यांनी सत्तारूढ होताना घेतलेली शपथ ही औपचारिकता नसून, संविधानिक प्रजासत्ताक भारताच्या जनतेप्रती घटनात्मक बांधिलकी असल्याचे सत्ताधारी नेते सोयीस्करपणे विसरत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
हेदेखील वाचा : Eknath Shinde News Update: मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?
गोपाळ तिवारी म्हणाले, ‘खरेतर निवडणूक काळात, सत्ताकाळात जनतेप्रती केलेल्या कामाचा लेखा-जोखा देण्याऐवजी ‘धर्म-जाती’च्या नावे ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणे हे संविधानविरोधी कृत्य असून, निवडणूक आयोग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने, लोकशाहीसाठी ही बाब दुर्दैवी असल्याचे गोपाळ तिवारी यांनी सांगितले. ‘भारतीय संविधान दिना’च्या औचित्याने राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना सुमनांजली वाहण्यात आली. ते पुढे म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या राज्यातील निवडणुकीत ‘लोकशाही राज्य व्यवस्थेच्या’ कार्याच्या लेखा-जोख्यावर चर्चा अपेक्षित असते. मात्र, घटनात्मक पदांवरील नेते यांनी ‘जाती-धर्माचे ध्रुवीकरण’ करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न अविवेकी आहे. १४० कोटींच्या देशात अल्पसंख्याक भारतीय मुस्लिम मात्र १८ कोटींच्या घरात असताना, सत्ताधारी भाजपकडून आगपाखड होणे हास्यास्पद असून, सामाजिक सुरक्षा राखण्यात भाजप सरकार अपयशी ठरत असल्याची पावती आहे’.
स्वातंत्र्य संग्रामात सर्वधर्मियांचे योगदान
स्वातंत्र्य संग्रामात सर्वधर्मियांचे योगदान असताना, संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष व समाजवाद’ शब्द काढण्याबाबतचा महत्वपूर्ण निकाल ‘सर्वोच्च न्यायालयाने’ काल संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला देऊन भारतीय संविधानाची व्याख्या ही स्वातंत्र्य, समता, बंधुता व समानता भिमुख’ असल्याचे सुस्पष्ट केल्याचे समाधान असल्याचे गोपाळ तिवारी यांनी यावेळी सांगितले.
संविधानाची तत्वे अंगिकारण्याची गरज
भारतीय नागरिकाने संविधानाची तत्वे अंगिकारण्याची गरज आहे. तरच आम्ही भारतीय नागरिक असे आपण म्हणू शकतो, असे विधान, पश्चिम महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी यावेळी केले. संविधानातील मतदानाचा हक्क ईव्हीएमच्या वावटळीत हरवला काय? असे वाटायला लागले असल्याचे ॲड. संतोष जाधव यांनी सांगितले. भारतीय संविधानाचे वाचन, प्रसारण व जागरुकता ही प्रत्येक भारतीयाने अंगीकृत करणे ही काळाची गरज असल्याचे ॲड. संदिप ताम्हणकर यांनी सांगितले.