राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात ३७ जिल्ह्यातील एकूण एक हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा २८ जून रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. परीक्षेसाठी उच्चांकी नोंदणी झाली होती. त्यात २ लाख ९० हजार ६६९ पुरुष, २ लाख ३७ हजार ४४८ महिला, पाच तृतीयपंथी अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी ‘पेपर एक’ आणि ‘पेपर दोन’ असे मिळून सहा लाख १२५ अर्ज भरले होते. यात सात हजार १३९ दिव्यांगांचा समावेश होता.
Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ
मात्र, शनिवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे टीईटी परीक्षेचे पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच टीईटी परीक्षेचेही पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ उडाली. तसेच या बाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले. परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारावर टीका करत, वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला. अनेक उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी दूरवरून प्रवास केला, निवास आणि इतर खर्च केला असून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धनंजय दळवी म्हणाले की, “राज्यात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. नीट, टीईटी तसेच इतर परीक्षांमधील गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्य परीक्षा परिषदेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना अटक करावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावरचा लढा सुरू ठेवेल. यापुढे कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटू नये, यासाठी कडक कायदे आणि प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
एसएफआय महाराष्ट्र राज्याचे राज्यसचिव , सोमनाथ निर्मळ म्हणाले की, टीईटी पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
अभिषेक शिंदे म्हणाले की, टीईटी परीक्षेचा पेपर फुटणे हा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्याचं लक्षण आहे. नीट, टीईटी सतत पेपर फुटण्याची मालिका सुरू आहे. याची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जबादारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.
एसएफआय जिल्हाध्यक्ष पुणे संस्कृती गोडे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेला SFI कधीही माफ करणार नाही. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींना कठोर शिक्षा आणि परीक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्यासाठी आमचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दालनातून खुर्ची बाहेर आणून त्यावर माठ ठेवत अनोखे आंदोलन केले. पेपरफुटीच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियते विरोधात हा प्रतीकात्मक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली.
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन (एनएसवायएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या संघटनेने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.






