खासदार सुप्रिया सुळे (फोटो- ट्विटर)
सुप्रिया सुळेंनी पुण्यात माध्यमांशी साधला संवाद
आरक्षणाच्या मुद्द्यावर केले भाष्य
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांवर वक्तव्य
Pune/पुणे: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.
विविध विषयांवर भाष्य करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही त्याबाबत पाठपुरावा करत आहोत.” आरक्षणाच्या विषयावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणावर बोलले पाहिजे. लोकांना नेमके काय ते कळत नाहीये. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे. सरकारमधलेच लोक या गोष्टीला चॅलेंज करत आहेत.”
‘सरकारने जो जीआर काढला आहे, त्यामुळे याबाबत त्यांनीच उत्तरे दिली पाहिजेत. आम्ही सरकारमध्ये नाही आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष म्हणून अनेकदा वेगळे लढलो. ठाकरेंबाबत आम्हाला काही अडचण नाही. आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. राज्याच्या हिताचे असे ते आम्ही करू. समविचारी असल्यास एकत्रीत काम करायला हरकत आहे? पारदर्शक कारभार झाला पाहिजे”,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लाईव्ह |📍पुणे |पत्रकारांशी संवाद
🗓️11-09-2025 https://t.co/JM8vLibYNs
— Supriya Sule (@supriya_sule) September 11, 2025
“भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का याबाबत आम्ही प्रश्न विचारणार आहोत. एकीकडे पाणी देत नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायचे. पुण्यात गुन्हे वाढत आहेत. सरकारने आत्मचिंतन करायला हवे. मोहन भागवत यांचा वाढदिवस आहे. वयाने मोठ्या लोकांवर मी टीका करत नाही,” असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी
मराठा समाजाबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय ओबीसी नेत्यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीला न जाता आपली नाराजी दाखवली आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना तुरुंगात पाठवा अशी अजब मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. ते म्हणाले की, छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत , त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.