फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चेओंकार कामठे यांची निवड झाली (फोटो - सोशल मीडिया)
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांची 20 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली. गुरुवारी (ता. 15) नगराध्यक्ष संतोष फकीरा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी निवडणूक सहायक म्हणून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त उद्या ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद
उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (दि. 15 जानेवारी) सकाळी नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओंकार कामठे व शिवसेनेच्या नगरसेविका राणी बाळासाहेब हरपळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विहित कालावधीत झालेल्या छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले. कुणीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष मतदान होणार हे निश्चित झाले होते.
हे देखील वाचा : ‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’
या निवडणुकीत भाजपाचे पाच नगरसेवक गैरहजर राहिले. मतदानात नगरसेवकांची 19 मते आणि नगराध्यक्षांचे एक मत अशी एकूण 20 मते ओंकार कामठे यांना मिळाली, तर राणी हरपळे यांना 8 मते मिळाली. त्यामुळे ओंकार कामठे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी केली. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
फुरसुंगी–उरुळी देवाचीच्या नव्या राजकीय इतिहासाला कलाटणी
दरम्यान, प्रथमच झालेल्या फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासह 32 पैकी 19 जागा जिंकत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पॅनल प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमी वयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी यशस्वीपणे पार पाडली असून, त्यांची उपनगराध्यक्षपदी झालेली निवड फुरसुंगी–उरुळी देवाचीच्या नव्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






