पुण्यात अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई नाही (फोटो- istockphoto)
पुणे: निवडणूक निकालानंतर शहरात जागोजागी अनधिकृतपणे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. महापालिकेने इशारा देऊनही हे फ्लेक्स लागले. यावर मात्रा म्हणून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे उद्योग महापालिकेने सुरू केले आहेत. महापालिका प्रशासनाने अनधिकृत फ्ले्क्स लावणार्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीसांना कळविले आहे. एकही गुन्हा अद्याप दाखल झाला नाही. न्यायालयाने कान टोचल्यानंतरही महापालिका आणि पोलीस प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचे समोर आले आहे.
शहरातील अनधिकृत जाहिरातींमुळे होत असलेल्या विद्रुपीकरणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेस दि. १९ नोव्हेंबरला याबाबत आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेने निवडणूक निकालानंतर शहरात कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नागारिकांनी अनधिकृतपणे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स तसेच कोणत्याही प्रकारच्या जाहीराती न लावण्याचे आवाहन केले होते.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. मात्र, एका बाजूला महापालिकेकडून हे आदेश काढण्यात आलेले असताना निवडणुक निकालानंतर काही तासांतच सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदारांना शुभेच्छांसह भावी मंत्री म्हणून जागोजागी फ्लेक्स, बॅनर, जाहिरातफलक लागले आहेत. महापालिकेकडून त्यावर साधी कारवाई करण्याचीही तसदी घेतलेली नाही. त्यामुळे एका बाजूला न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात असतानाच या आदेशाचे राजरोसपणे उल्लंघन होत असताना महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
पालिका निवडणुकीच्या शक्यतेने बॅनरबाजी
दरम्यान, आता महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत. काही भागात फ्लेक्समुळे पदचार्यांना चालणे देखील कठीण झाले आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना फ्लेक्स लक्ष वेधून घेत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. संपूर्ण पुणे शहरात हे चित्र आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने युध्दपातळीवर कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून बेकायदा फ्लेक्स लावणार्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले जात आहे. तसेच, सुमारे अडीच लाख रूपयांचा दंडाच्या नोटीसाही दिल्या गेल्या आहेत. लवकरच शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स, बॅनर हटविले जातील.
– प्रशांत ठोंबरे, आकाशचिन्ह विभाग प्रमुख, पुणे महापालिका.