(सौजन्य - नवराष्ट्र टीम)
पेठ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता पोल्ट्री व्यवसायावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. ओमान तसेच इतर अरब देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात अंडी निर्यात केली जात होती. मात्र युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने अंड्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढू लागला असून त्याचा थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाल्याचे दिसून येते.
युद्धापूर्वी अंड्याचा होलसेल दर साधारणपणे पाच ते साडेपाच रुपये होता. मात्र सध्या निर्यात कमी झाल्यामुळे अंड्याचा होलसेल दर चार रुपये सत्तर पैशांपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांचे खाद्य, औषधे आणि देखभाल यावर खर्च वाढत असून, एका अंड्याचा उत्पादन खर्च साधारण चार ते साडेचार रुपये येत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.
“पूर्वी निर्यात चांगली असल्यामुळे अंड्यांना चांगला दर मिळत होता. आता निर्यात घटल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे. खर्च वाढत असताना दर कमी झाल्याने पोल्ट्री व्यवसाय टिकवणे कठीण होत आहे.” -शफीभाई मोमीन, आंबेगाव ऍग्रो शिनोली
स्थानिक बाजारावर वाढतोय दबाव
दर घसरल्यामुळे अनेक पोल्ट्री शेतकऱ्यांना नफ्याऐवजी तोट्याचा सामना करावा लागत आहे. उत्पादन सुरू असताना निर्यात कमी झाल्याने स्थानिक बाजारावर दबाव वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या फारसा नफा देणारा राहिला नसल्याची भावना अंडी उत्पादक शेतकरी गोविंद थोरात, निकेतन दैने, माया शंकर थोरात यांनी व्यक्त केली.
युद्धपरिस्थिती लवकर शांत होऊन निर्यात पुन्हा सुरू झाली तरच पोल्ट्री उद्योगाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. -प्रमोद हिंगे पाटील, उर्जा फूड्स प्रा. ली. निरगुडसर.
स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा
अमेरिका–इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जागतिक स्तरावरच नव्हे तर स्थानिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्याची झळ पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरालाही बसू लागल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहतूक खर्च वाढत असून, त्याचा थेट परिणाम गॅस पुरवठा, बांधकाम साहित्य, उद्योग तसेच शेतीमालाच्या बाजारभावांवर होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ झाली असून, व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल, ढाबे, खानावळी, मिठाई दुकाने तसेच लघुउद्योग आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा विचार करावा लागत आहे.






