VIP दर्शन बंद; पण 'VIP'लाच मोकळा रस्ता ! पंढरीत पहिल्याच दिवशी नियमांना हरताळ; मुनगंटीवार रांगेत अन् गुलाबराव थेट गाभाऱ्यात
पंढरपूर / शिवाजी हळणवर : विठुरायाच्या नगरीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा सर्व सावळा गोंधळ समोर आणणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद केले, असे असताना पहिल्याच दिवशी या नियमांचा पुरता बोजवारा उडाला.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ‘VIP दर्शन पूर्णपणे बंद’ असल्याचा गाजावाजा प्रशासनाने केला. मात्र, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी या या वर्षाची अक्षरश: राखरांगोळी झाल्याचे चित्र समोर आले. एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कुटुंबासह दर्शनासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागले, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांना थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याचा प्रकार समोर आल्याने मंदिर प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, भाजप नेते सुधीर मनगटीवर यांना ताटकळत उभे केले तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह थेट गाभाऱ्यात प्रवेश दिल्याने प्रशासनाचा दुहेरी चेहरा उघड झाला.
एकाच मंदिरात दोन नियम?
मंदिर प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात एका विद्यमान आमदारासह कुटुंबाला प्रतीक्षा, तर दुसऱ्या मंत्र्याच्या कार्यकर्त्यांना थेट प्रवेश मिळाल्याने एकाच मंदिरात दोन वेगवेगळे नियम लागू आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविक आणि वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुनगंटीवारांची नाराजी; ‘निमंत्रण देऊनही अपमान’
भाजपचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निमंत्रणानुसार, आपण कुटुंबासह दर्शनासाठी आलो. मात्र, मंदिरात पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून आला. कालच जिल्हाधिकाऱ्यांनी पाच-पाच लोकांना प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. तर आता इथे आल्यानंतर त्यांनी नियम लागू केला. अशा पद्धतीची व्यवस्था अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
दर्शन तर घेणारच ! गुलाबराव पाटलांची स्पष्ट भूमिका
दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट दर्शन घेतल्याचे नाकारले नाही. उलट, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. १२ तासांचा प्रवास करून आलो आहोत. विठ्ठलाचे दर्शन मिळायलाच हवे. माझ्यासोबत आलेल्या पाच-सहा जणांनाही प्रवेश देण्यात आला, असे स्पष्ट सांगत त्यांनी या प्रकाराचे समर्थन केले.
24-30 तास रांगेत वारकरी आणि VIP संस्कृती कायम
आषाढी वारीत लाखो वारकरी २४ ते ३० तास रांगेत उभे राहून विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहतात. अशा वेळी VIP दर्शन बंद असल्याचे सांगणारे प्रशासन प्रत्यक्षात निवडक लोकांसाठी नियम शिथिल करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नियम सामान्यांसाठी आणि सवलती सत्ताधाऱ्यांसाठी? असा संतप्त सवाल वारकरी उपस्थित करत आहेत.
प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात
पहिल्याच दिवशी उघड झालेल्या या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर VIP दर्शन खरोखरच बंद असेल, तर काहींना विशेष प्रवेश कसा मिळाला? आणि जर विशेष प्रवेश देणारच असाल, तर सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा कशासाठी? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे आता आवश्यक झाले आहे. पंढरीत विठ्ठल सर्वांचा असताना, दर्शनाच्या दारात मात्र समानतेचा सिद्धांत हरवल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.






