Maharashtra Rain Update: २० जुलैनंतर मान्सून धुमाकूळ घालणार? पुण्यासह आज 'या' ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Update: जुलैचा अर्धा महिना उलटून गेला असतानाही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २० जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान इशारा जारी केलेला नाही.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या भागातही ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरण कायम असल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार, याकडे लागले आहे.
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसासाठी अनुकूल हवामान प्रणाली सक्रिय नसली, तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढतो का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.






