अनधिकृत फ्लेक्सधारकांवर पालिकेची कारवाई (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: शहरात अनधिकृत फ्लेक्स बॅनरबाजी सुरू असतानाच अनधिकृत फ्लेक्स विरोधात महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह विभागाने कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात एकूण ५२ लाख रुपयाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ११० जणांविरुद्ध कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७ मध्ये अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या वर्षी असेच आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृतपणे उभारले जाणार्या होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध मागील तीन महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे, त्याअंतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये १४४९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दुसरी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६५९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्यात आले. कारवाईत सातत्य ठेवून ५२लाख ३२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ११० व्यक्ती संस्था, नागरीक, व्यावसायिक यांचेवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हे केले आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी दिली.
इथे करा तक्रार
सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांची जबाबदार तथा अंमलबजावणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असुन त्यांचेवर नियंत्रण ठेवणेकामी संबंधित उप आयुक्त परिमंडळ क १ ते ५ यांची नोडल / पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
– नागरिकांना अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बैनर याचाबत तक्रार करावयाची असल्यास
पीएमसी केअर ऐप, W-Web-pmc.gov.in, कॉल सेंटर (18001030222) , व्हॉट्सअॅप -9689900002, ईमेल feedback@punecorporation.org येथे तक्रार करावी.
अभ्यासिका, क्लासचालक यांच्या विरोधात कारवाई
पुणे : महापालिकेची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता जाहीरात फलक लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने सदाशिव पेठेतील तीन अभ्यासिका व क्लासचालकांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनीही संबंधीतांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील अप्पा बळवंत चौक, नुमवि शाळे शेजारी, शनिपार चौक, शनि मंदिराजवळ, बाजीराव रोड येथे महापालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे काही अभ्यासिकांनी व स्पर्धा परीक्षेच्या क्लासचालकांनी बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आकाश चिन्ह व परवाना निरीक्षक केदार पुरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधीत अभ्यासिका चालक व क्लासचालकांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधीतांवर गुन्हा दाखल केल्याचे पुरी यांनी सांगितले.