HMPV व्हायरसबाबत पुणे महानगरपालिका अलर्ट (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: चीनमध्ये फैलावलेल्या ‘एचएमव्हीपी’ या विषाणूमुळे हाेणाऱ्या संसर्गज्य आजाराच्या पार्श्वभुमीवर महापािलकेचा आरोग्य विभाग अलर्ट माेडवर आला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या सुचनेनुसार कार्यवाही सुरु केली असुन, नायडू रुग्णालयात साडे तीनशे बेड राखीव ठेवण्यात आले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रीनिंग करण्याविषयी तयारी सुरु केली आहे.
एचएमव्हीपी या विषाणूचा चीन मध्ये फैलाव झाला आहे. तसेच मलेशिया मध्ये या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहे. त्यानुसार पुणे महापािलकेने कार्यवाही करण्यास सुरुवात केली.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या आरोग्य विभागांसाठी नियमावली तयार केली आहे. याबाबत शुक्रवारी (ता.३) आणि सोमवारी (ता.६) रोजा राज्य शासनाची बैठक पार पडली. त्यावेळी ही नियमावली जाहीर केली असून महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांना पाळण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यात अजून एकाही रुग्ण नाही पण महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून बेड राखीव ठेवण्यासाठी पत्र देण्यात आले आहेत.
हेही वाचा: HMPV व्हायरसचा भारतातील नागरिकांना कितपत धोका? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे? वाचा सविस्तर
घाबरून जाऊ नका
विषाणूची चर्चा होत असली तरी त्याला घाबरु नये, नेहमीप्रमाणे आपण काळजी घ्यावी. कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्क, सॅनिटायझर वापरले त्याप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात ताप येणे, सर्दी, खोकला असे आजार होत असतात. अती अशक्तपणा येणे, उलट्या होणे, ताप वाढणे, श्वासनाचा त्रास होत असेल तर रुग्णालयात अॅडमीट डॉक्टरांच्या सल्ल्याने केले जाते. अशा रुग्णांचा माहिती गोळा करण्याची तसेच महापालिकेला तात्काळ देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रीनिंग करण्यासंदर्भातही प्रयत्न सुरु झाले आहे.
नायडू रुग्णालयामध्ये ३५० बेड
पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये ३५० बेडची व्यवस्था आहे. हे रुग्णालय विशेष संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा: CM Devendra Fadnavis : HMPV व्हायरसवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “राज्यात….”
सध्यातरी कोणत्याही रुग्णाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले जात नाहीत. गंभीर रुग्ण आढळून आला तर त्याचे सॅम्पल घेवून तपासणीसाठी पाठवले जातील. पुणे विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी सध्यातरी केली जात नाही. परंतु याबाबत बैठक घेवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला जाईल.
– नीना बोराडे, आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महापालिका.
उपाययाेजना करण्याची शिवसेनेची मागणी
गुजरात आणि कर्नाटक या दाेन राज्यात सदर विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तत्काळ उपाययाेजना करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांना शहरप्रमुख संजय माेरे, गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. यापुर्वी पुण्यात स्वाईन फ्ल्यु, काेराेना या विषाणूंची लागण झालेले रुग्ण देशात प्रथम आढळून आले हाेते. पुण्यात साथराेग झपाट्याने पसरत असल्याने आरोग्य विभागाने आत्ताच उपाययाेजना करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.