'भुयारी मार्गा'च्या अवस्थेला जबाबदार तरी कोण? (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे/प्रतिक धामोरीकर: शहरातील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहनांना सामान्य रस्ते मिळावेत आणि लोकांना चालण्यास अडचण येऊ नये म्हणून, शहरातील विविध ठिकाणी अंडर बायपास तर काही ठिकाणी रस्ता ओंलाडण्यासाठी काही चौकांमध्ये भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे सद्य स्थितित शहरातील १५ भुयारी मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक सबवेचे (भुयारी मार्ग) दरवाजे बंद असून परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याचे सामोरे आले आहे.
शहरातील जे.एम. रोडवरील मॉडर्न कॉलेजला लागून पादचाऱ्यांसाठी महानगरपालिकेने जी.एम. भोसले सबवे बांधला आहे. परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे सद्य स्थितित या सबवेची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी भुयारी मार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रादेशिक कार्यालयांकडे सोपवली आहे. याशिवाय, सबवेमध्ये बसवलेले खराब झालेले दिवे विद्युत विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने बदलणे आवश्यक आहे. तर इतर कामे प्रकल्प विभागाकडून केली जातात. परंतु या प्रकरणात, प्रादेशिक कार्यालयांचे म्हणणे आहे की सबवे प्रकल्प विभागाने बांधले असल्याने, त्याची साफसफाई देखील त्यांनीच करावी. या परिस्थितीवर महापालिका प्रशासनाने मौन बाळगले आहे.
पुणे महानगरपालिकेने पादचाऱ्यांच्या सोयीसाठी 5 ते 6 कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग बांधले आहेत. त्यामुळे नागरिक सावकाशपणे रस्ता ओलांडू शकतात आणि अपघात टाळू शकतात. त्याचप्रमाणे, चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, वाहनांसाठी एक अंडरपासची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाने मोठ्या थाटामाटात आणि कोट्यवधी रुपये खर्चून भुयारी मार्ग बांधला आहे, परंतु बांधलेल्या भुयारी मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात ना सुरक्षा व्यवस्था आहे, ना योग्य स्वच्छता. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही, या सर्व ठिकाणी झालेल्या दयनीय अवस्थेला अखेर जबाबदार तरी कोण, असा प्रश्न पुण्यातील सामान्य जनता मनपा प्रशासनाला विचारत आहे.
पुण्यातील ‘या’ गंभीर प्रश्नावरून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; हायकोर्टात जाण्याचा दिला इशारा
या ठिकाणी “सब वे” बांधण्यात आला होता.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोथरूड, कर्वेनगर, जंगली महाराज रोड, सातारा रोड, (अहिल्यानगर) अहमदनगर रोड, विश्रांतवाडी, हडपसर आणि इतर भागातील भुयारी मार्ग बांधन्यात आले असून सद्य स्थितित त्यांची देखभाल केली जात नाही. तसेच, परिसरात पाण्याची गळती, अनियमित कचरा संकलन, अनेक ठिकाणी काही दिवे बंद असल्याने अपुरा प्रकाश आणि दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे समस्या वाढत आहे.
कोट्यावधी रुपयांची निविदा मात्र सोयीचे काय हो..?
पादचाऱ्यांच्या आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी, महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांच्या निविदाही काढल्या जातात. पण लोकांच्या सोयीसाठी बांधलेल्या त्या सर्व गोष्टी आता मद्यपींचे अड्डे झाले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षेअभावी महिला आणि मुली सबवे वापरण्यास टाळाटाळ करतात.
भुयारी मार्गाच्या देखभालीवर दरवर्षी लाखो रुपयांचा निधि खर्च केल्या जात असून नागरिकांना सुविधा मिळत नसताना त्याचा काय फायदा? शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा असली तरी, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु महापालिकेच्या स्वच्छता, प्रकल्प आणि इतर अधिकाऱ्यांनी अस्पष्ट उत्तरे दिली. सबवेच्या स्वच्छतेबाबत आणि देखभालीबाबत वरिष्ठ अधिकारी पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येईल आणि परिसराची पाहणी केली जाईल, तसेच यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.