पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने पुणे पोलिसांनी यंदा गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन केले आहे. पालखी मार्गावर दर्शनासाठी एकेरी मार्ग व गर्दीतील चेंगराचेंगरी व दर्शन शांततेत होण्यासाठी यंदा “एकेरी दर्शन” व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी प्रस्थान सोहळा ८ जुलै रोजी होणार आहे. ९ जुलैला दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत. पुण्यनगरीत पालखीचे आगमन झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मार्गावर ठिकाणी दर्शन करण्यासाठी जातात. तेव्हा होणारी चेंगराचेंगरी एकेरी दर्शन व्यवस्था करण्यात येणार असून, त्याची रंगीत तालीम शुक्रवारी शिवाजीनगर येथील परेड मैदानावर पार पडली.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा भाविकांना पालखीचे दर्शन केवळ समोरून एकाच बाजूने घेता येणार आहे. दोन्ही बाजूने किंवा विरुद्ध दिशेने भाविकांना दर्शनास परवानगी दिली जाणार नाही. भाविकांनी समोरून येऊन दर्शन घेतल्यानंतर त्याच मार्गाने मागील बाजूने बाहेर पडावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या नियोजनामुळे गर्दीचे नियंत्रण सुलभ होऊन चेंगराचेंगरीचा धोका टाळता येणार आहे. या व्यवस्थेची शुक्रवारी शिवाजीनगर येथील परेड मैदानावर प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली.
३०० कर्मचारी, ५० अंमलदारांची सहा विशेष पथके
पालखी सोहळ्यात गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पुणे शहर पोलिसांनी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी शिवाजीनगर येथील परेड मैदानावर सुमारे ३०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसाठी १५०-१५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले.
याशिवाय, प्रत्येक पालखीसोबत ५० पोलिस अंमलदारांची सहा विशेष पथके तैनात राहणार आहेत. ही पथके पालखी शहरात प्रवेश केल्यापासून विसाव्याच्या ठिकाणांपर्यंत, प्रमुख चौकांमध्ये तसेच दर्शनस्थळांवर कार्यरत राहतील. गर्दीचे नियोजन, भाविकांना मार्गदर्शन, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे आणि पालखीचा मार्ग मोकळा ठेवणे, ही या पथकांची प्रमुख जबाबदारी असणार आहे. पालख्या पुणे शहरातून पुढील मार्गस्थ होईपर्यंत ही सर्व पथके सतत बंदोबस्तावर तैनात राहतील.
पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी ‘टेहळणी टॉवर’ उभारणार; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश






