सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : ट्रिपलशीट तसेच विरूद्ध दिशेने प्रवास करणाऱ्यांसोबतच आता वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा (टिंटेड ग्लास) आणि फॅन्सी नंबर प्लेट विरोधात विशेष मोहिम उघडली असून, तीन दिवसांत २ हजार २०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान वाहनांवरील काळी काच जागेवरच काढून टाकली जात आहेत. तर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट जप्त करण्यात येत आहेत. पोलिसांच्या या कारवाईने बेशिस्त वाहन चालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात वाहतूक संत गतीने तर वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे यात भर पडते. तर अपघात देखील होतात. अनेकवेळा वाहनांना काळ्या काचा लावून त्यातून अवैध प्रकार होत असल्याचे उघडकीस आलेले आहे. काळ्या काचा व फॅन्सी नंबर प्लेटबाबत न्यायालयाचे नियम आहेत. मात्र, त्याचेही उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरभर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोहिमेत वाहतूक शाखेची विविध पथके शहरातील प्रमुख चौक, रस्ते व गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकावर ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. शिवाय, वाहनावरील काळी फिल्म तात्काळ काढून टाकण्याची कारवाई केली जात आहे. फॅन्सी नंबर प्लेटही जागेवरच काढून जप्त करण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित नमुन्याच्या नंबर प्लेटच वापरण्याचे व वाहनांवर प्रतिबंधित काळी फिल्म न लावण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही सातत्याने अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
२९ जून
काळ्या काचांवरील कारवाई : २७५
फॅन्सी नंबर प्लेट : ५८३
३० जून
काळ्या काचांवरील कारवाई : २७०
फॅन्सी नंबर प्लेट : ५६०
१ जुलै
काळ्या काचांवरील कारवाई : १६२
फॅन्सी नंबर प्लेट : ३५२
तीन दिवसांची एकूण आकडेवारी
काळ्या काचा असलेली वाहने : ७०७
फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने : १,४९५
एकूण कारवाई : २,२०२ वाहने
प्रत्येक वाहनावर दंड : ५०० रुपये






