संग्रहित फोटो
या गटातून यापूर्वी सलग तीन वेळा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे निवडून आले होते. चौथ्यांदा त्यांच्या पत्नी सुनीता शरद बुट्टे पाटील यांची निवड झाल्याने या गटातील बुट्टे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आंबेठाण पंचायत समिती गणातून श्रद्धा मांडेकर यांनी अत्यंत चुरशीच्या व थरारक लढतीत अवघ्या १६ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अखेरच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट झाल्याने परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
विजयानंतर सुनीता बुट्टे पाटील व श्रद्धा मांडेकर यांनी मतदारांचे आभार मानत, परिसरातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या निकालामुळे पाईट–आंबेठाण परिसरातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी काळात या भागातील विकासाच्या दृष्टीने या विजयाकडे महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाचा पराभव
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय नेत्यांची झोप उडवली आहे. परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रमुख भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाला पूर्णपणे नाकारल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या वरपुडकर कुटुंबासाठी ही निवडणूक एका मोठ्या राजकीय झटकाच मानली जात आहे. याचे कारण म्हणजे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांपैकी चार जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.






