पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक – सुरेश प्रभू
पर्यावरण आणि हवामान बदलाचा विषय अधिक संवेदनशील
आपल्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता
सुरेश प्रभू यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
पुणे: गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण आणि हवामान बदलाचा विषय अधिक संवेदनशील बनला असून या बदलांना सामोरे जाताना प्रत्येकाने आपल्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. जे. पी. श्रॉफ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार २०२५’ सोहळ्यात पुण्यात बोलत होते. यावेळी प्रभू यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बोट क्लब येथे झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रदीप भार्गव, गणेश नटराजन, आशिष गायकवाड, जे. पी. श्रॉफ, सुजाता श्रॉफ आदी मान्यवर उपस्थित होते. याच सोहळ्यात स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या महासंचालिका सुनीता नारायण, कोरु कार्टन इंडिया संस्थेचे संदीप अग्रवाल, अशाया वेस्ट रिसायकल्सचे संस्थापक अनिश मालपाणी आणि थरमॅक्सच्या अध्यक्षा मेहेर पदमजी यांना सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Pune News: ‘पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना…”; ‘या’ कार्यक्रमात काय म्हणाले सुरेश प्रभू?
प्रभू म्हणाले, हवामान बदल ही मानव निर्मित समस्या आहे. हवेची गुणवत्ता खराब होत असून त्यातून अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून रुग्णालयांची संख्या वाढवण्याऐवजी समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. मानसिकता बदलाच्या प्रक्रियेला सामाजिक व धार्मिक मूल्यांची जोड दिल्यास हा बदल अधिक वेगाने घडू शकतो.
पुरस्कार सोहळ्यापूर्वी ‘शाश्वत संस्था, शहरे आणि समाज’ या विषयावर चर्चासत्र झाले. शहरे पर्यावरणपूरक व शाश्वत असणे अपरिहार्य असल्याचे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या वापरातून शाश्वत विकास साधता येईल, असे मत शेखर सिंह यांनी व्यक्त केले. अंकिता व प्रणती श्रॉफ यांनी सस्टेन अँड सेव्ह उपक्रमाविषयी माहिती दिली. सिद्धार्थ भागवत यांनी सूत्रसंचलन केले. नम्रता यांनी आभार मानले.
पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना भेडसावत आहे – प्रभू
जागतिक पातळीपासून स्थानिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण झाले नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.






