Photo : iStock
दौंड : म्हशींना त्यांचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसीऔषधाचे इंजेक्शन देऊन, इंजेक्शनचा गैरवापर करत प्राण्यांवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना दौंड शहरातील पानसरे वस्ती भागात उघडकीस आली. अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या वतीने दौंड शहरातील पानसरे वस्ती येथील म्हशींच्या गोठ्यावर छापा मारून औषधे जप्त केली आहेत.
हेदेखील वाचा : Ram Mohan Naidu: “विकसित भारताच्या निर्मितीसाठी…”; ‘भारतीय छात्र संसदे’त केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचे आवाहन
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत (रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, बावधन पुणे) यांनी फिर्याद दिली असून, दौंड पोलिसांनी दिनेश दत्तात्रय हिरणावळे (रा. हनुमान मंदिराजवळ, वडार गल्ली दौंड) व समीर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती की, 7 फेब्रुवारी रोजी पानसरे वस्ती येथील दिनेश हिरणावळे हे त्यांच्या गोठ्यातील म्हशींना दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसीन औषधाचे इंजेक्शन देऊन या इंजेक्शनचा गैरवापर करत असल्याची माहिती फिर्यादी औषध निरीक्षक सावंत यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 8 फेब्रुवारी रोजी आपले सहकारी औषध निरीक्षक सचिन बुगड, अन्नसुरक्षा अधिकारी बारवकर तसेच दौंड पोलिसांचे पथक यांनासोबत घेत पानसरे वस्ती येथील गोठ्यावर छापा मारला.
गोठ्याचे मालक दिनेश हिरणावळे तेथे उपस्थित होते. गोठ्याची तपासणी केली असता त्या ठिकाणी हिरणावळे यांच्या मालकीच्या ४० म्हशी आढळून आल्या. तसेच १०० मिली मापाच्या ३ लेबल नसलेल्या वापरलेल्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या. त्याचप्रमाणे एक २० मिलि ट्रान्सपरंट लिक्विड असलेली औषधाची बाटली व चार वापरलेले प्लास्टिकचे सीरींज तसेच एक निडल सापडली. सदर मिळालेल्या बाटल्या, औषधांबबाबत दिनेश हिरणावळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे औषध ऑक्सिटोसीन असल्याचे सांगितले.
सदरच्या औषधाचा वापर हा गोठ्यातील म्हशींना इंजेक्शनद्वारे देऊन त्यांच्याकडून जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन करून लोकांना विक्री करत असल्याचे सुद्धा त्याने सांगितले. सदरचे औषध (११० बाटल्या, ४० रु. प्रति) त्याने आठ दिवसांपूर्वी समीर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे कबूल केले. हिरनावळे याला इतर बाटल्यांबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर औषध खरेदी, साठवणूक व विक्रीबाबतचा औषधे व सौंदर्य प्रशासन कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवाना सुद्धा त्याच्याकडे नाही. गोठ्यातून जप्त केलेल्या औषधांच्या बाटल्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.
जनावरांना पाना करण्यासाठी सदर औषधाचा गैरवापर होतो. इंजेक्शनमुळे जनावरे जास्त प्रमाणात दूध देतात, हे दूध मानवी आरोग्यास हानिकारक असून, त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर विषारी परिणाम होतात. ऑक्सिटोसीन इंजेक्शन हे हार्मोन्स असून, त्याचा वापर प्रसूती सुरळीत करण्यासाठी होतो. हे सर्व माहीत असतानाही आरोपी दिनेश हिरणावळे याने सदरचे इंजेक्शन गैरमार्गाने मिळविले व प्राण्यांना इंजेक्शनद्वारे औषध देऊन प्राण्यांवर कृरतेने अत्याचार केला असेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.