सौजन्य - नवराष्ट्र टीम
दौंड : दौंड तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार तसेच ज्येष्ठ सहकार नेत्या उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दौंड तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उषादेवी जगदाळे पाटील यांनी सन १९७१-७२ या कालावधीत दौंड नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून काम पाहिले. त्यानंतर सन १९७२ ते १९७७ या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दौंड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत त्या तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. पुढे सन १९८५ ते १९९० या कालावधीत इंडियन काँग्रेस (सोशलिस्ट) पक्षाच्या तिकिटावर त्या पुन्हा विधानसभेत निवडून गेल्या.
आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी महिला सक्षमीकरण, शेतकरी प्रश्न, ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या आणि कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. सहकार क्षेत्रातही त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याचा ठसा आजही तालुक्यात कायम आहे. उषादेवी जगदाळे पाटील या दौंड शुगर्सचे संचालक तसेच पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष वीरधवल जगदाळे पाटील आणि विद्यमान नगरसेवक इंद्रजित जगदाळे पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रीया
उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि जनसेवेत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. मी उषादेवींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या दुःखद प्रसंगी वीरधवल जगदाळे आणि संपूर्ण जगदाळे कुटुंबीयांप्रती मी सहसंवेदना व्यक्त करते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
हे सुद्धा वाचा : कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित; ऊन अन् विजेच्या अतिवापरामुळे केबलमध्ये बिघाड






