रायगड/पाली : कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस येत नाही ? काही दिवसांपासून मराठी हिंदी वाद मोठ्या प्रमाणात राज्यात सुरु होता काही अंशी तो आता ही कुठे ना कुठे सुरु आहे. अशातच आता मराठी भाषेसाठी मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड फुड एक्सपोर्ट इंडिया या प्रदर्शनसाठी रायगडच्या उन्हेरे सुधागड येथील अक्षता अधिकारी यांच्या फळ प्रक्रिया उद्योगाची निवड झाली आहे. अक्षता अधिकारी यांचा साई फुड्स या नावाचा फळ प्रक्रिया व्यवसाय आहे. पल्पा या ब्रँड नावाने त्या पदार्थांची निर्मिती करतात. यामध्ये जाम आंब्याचा पल्प जेली चॉकलेट यासारखी उत्पादने आहेत. यामधून त्यांनी 70 ते 80 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
वर्ल्ड फुड इंडिया या प्रदर्शनासाठी 72 देशातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहे. रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प ठरत आहे. सुधागड तालुक्यामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या योजनेखाली या उद्योगाची उभारणी झाली आहे. सुधागड तालुक्यातील फरसाणा, राईस मिल, फळ प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती बेकरी उद्योग अशा व्यवसायांची निर्मिती या योजनेतून झाली आहे. तालुका कृषी अधिकारी श्रीमती दयावंती कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन या प्रकल्पांना होत आहे. कृषी विभाग तसेच जिल्हा संशोधन व्यक्ती दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्था यांनी प्रकल्पाला सहकार्य केले आहे.
प्रकल्पाची दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड फुड इंडिया प्रदर्शनासाठी आमदार रवीशेठ पाटील यांनी प्रकल्पाला शुभेच्छा व अर्थसाहाय्य केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी व बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या अन्न प्रक्रिया उद्योगात समाविष्ट होण्याचे आवाहन आमदार रविशेठ पाटील व तालुका कृषी अधिकारी श्रीमती दयावंती कदम यांनी केले आहे.