म्हसळा ( वार्ताहर ) : ग्रामीण आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे १४ वर्षीय मुलाचा नाहक जीव गेल्याची घटना समोर आली आहे. म्हसळा तालुक्यात गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी घडली आहे.गर्वांगच्या मृत्युने घूम गावासाठी संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्युला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केले आहेत.
गर्वांगच्या पायावर केस पूळी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री १०:३० च्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उप जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री १ वाजे पर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेहले असता तेथील डॉक्टरांनी याला तर केस पुळी झाले, यावेळी ताप येत.. एवढ्या छोट्या गोष्टी साठी १०८ ची रुग्णवाहिका कशाला आणायची. म्हसळयाचा डॉक्टरांना काही समजत नाही का असे बोलून विना उपचार करता त्याचा घरी पाठवले असे गर्वांगचा वडिलांनी पोलिसात दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
मात्र गर्वांग घरी पोहचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवली असती तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थानी व्यक्त केली. गर्वांग उपचार न करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबांनी केली आहे.