कर्जत/संतोष पेरणे: नगरपरिषदेच्या अतिरिक्त मालमत्ता कराबाबत नागरिकांना करमाफी देण्यात येणाऱ्या अभय योजनेत मुदतवाढ करा, असं निवेदन शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. नगरपरिषदेच्या मालमत्ता करावरील अतिरिक्त मालमत्ता करमाफीच्या अभय योजनेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कर्जत शहर शिवसेना यांच्यावतीने करण्यात आली. शिवसेना पक्षाने शास्ती माफीसाठी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मुदतवाढ दिल्याने अभय योजनेचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
कोरोना काळात नागरिकांचे उत्पन्नाचे साधन आणि स्रोत कोलमडल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात मोठ्या प्रमाणात मालमत्ताधारकांनी कर भरण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्या थकबाकीची रक्कम वाढत गेली. त्यावर लागणाऱ्या दोन टक्के शास्तीमुळे अनेकांचे ओझे वाढले. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शास्ती माफीची मागणी केली होती. या मागणीला शासनस्तरावर मान्यता मिळून शास्ती माफी योजना जाहीर करण्यात आली.शहरातील अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज भरता न आल्याने, वाढीव कालावधी देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
मात्र या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना अनेक सण-उत्सवांमुळे तसेच कर्जत नगरपरिषदेने अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर निश्चित केल्याने अनेकांना अर्ज सादर करता आले नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्याची संधी हुकल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अभय योजनेचा कालावधी वाढवून आणखी दोन महिने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाढीव मुदतीमुळे अधिकाधिक नागरिकांना कर माफीचा लाभ घेता येईल आणि नगरपरिषदेच्याही कर वसुलीमध्ये वाढ होईल, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.
कर्जत शिवसेना शहर यांच्यावतीने शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्यासह संजय मोहिते, दिनेश कडू, सुदेश देवघरे, प्रदीप वायकर, संदेश मोरे, दर्शन वायकर, सौरभ केदारी आणि प्रसाद डेरवणकर उपस्थित होते. या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी खात्री मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली.






