पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, लवकरच माथेरान मिनी ट्रेन सुरु होणार
किरण बाथम,रायगड: मुंबईआणि पुण्यापासून जवळ तेही निसर्गाच्या सान्निध्यात वससेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान. या माथेरानच्या निसर्ग सौंदर्याने आजवर अनेकांना भूरळ पाडली आहे. डोंगर, दऱ्याखोऱ्यातील माथेरान पाहण्यासाठी पर्यटाकांचा कायम ओघ असतो. त्याचबरोबर माथेरानची राणी असलेली मिनी ट्रेनची सफर ट्रेकर्स आणि पर्यटकांना कायमच आकर्षित करतो. अशातच आता ही मिनी ट्रेन लवकरच सुरु होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा- परफेक्ट ऑफबीट बीच व्हेकेशनसाठी भारतातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या; प्रवास होईल रोमांचकारी
पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात येते. तर दसऱ्याला मोठ्या उत्साहात हि सेवा पूर्ववत सुरु होते. यंदा मुहूर्त चुकला असला तरी माथेरानमधील दिवाळीच्या हंगामासाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.लवकरच माथेरानची राणी रुळावर येणार असून तिची शीळ पुन्हा एकदा येथील दऱ्याखोऱ्यात घुमणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा- ट्रेनचे वेटिंग तिकीट रद्द करूनही पैसे परत मिळत नसतील तर ‘अशी’ करा तक्रार; लगेच मिळेल रिफंड
जून महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टीने नेरळ ते माथेरान सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. दरवर्षी पावसाळ्यात ही सेवा मध्य रेल्वे प्रशासनाकडून बंद केली जाते. २००५ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे हू सेवा पूर्णतः कोलमडली होती. मात्र केवळ माथेरानच्या राणीवर प्रेम असलेले प्रवासी व माथेरानकर यांची इच्छाशक्ती यामुळे हि सेवा सुरु झाली. तेव्हापासून माथेरानला पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे नेरळ माथेरान सेवा पावसाळ्यात बंद ठेवण्यात येते. तर दसऱ्याचा मुहूर्त गाठत ही सेवा पूर्ववत सुरु केली जाते. असं असलं तरी पावसाळ्यात अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरु असते. थंडीच्या दिवसात फिरण्यासाठी प्रत्येकाचं आवडीचं ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरानची राणी ही सर्वांची आवडती आहे. १०० वर्ष पूर्ण केलेली ही रेल्वे सेवा आजही पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वर्षाकाठी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात.






