कर्जत/ संतोष पेरणे : कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ गावमधील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रात्रीच्या वेळी अंधारात भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीमध्ये पडला. अंधारात उडी मारताना बिबट्याचे डोके दगडावर आपटल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितलं आहे.
आंबिवली गावाच्या मागे कोथळीगड उभा असून या गडाच्या काही किलोमिटर अंतरावर पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होते. गडाच्या आजुबाजूचा परिसर हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. या भागात आधीपासूनच बिबट्याचे वास्तव्य आहे. तेथील ग्रामस्थ संजय सखाराम सावंत यांनी आपल्या मालकीच्या मौजे-पेठ गावातील सर्व्हे नंबर 24 मध्ये विहीरीत बिबट मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती वन कर्मचाऱ्याला दिली.
गावकऱ्यांनी माहिती देताच धामणी येथील वनपाल यांनी तत्काळ ही माहिती कर्जत पूर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना दिली.घटनेचे गांभीर्य लक्ष्य घेवून वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी घटनेची माहीती पनवेल सहायक वनसंरक्षक आणि अलिबाग येथील उपवनसंरक्षक यांना भ्रमध्वनीव्दारे माहीती दिली.घटनास्थळी पाहणी केली असता सदर मृत बिबट हा भक्ष्याच्या शोधात असताना रात्रीच्या अंधारात विहिरीत पडला आहे.त्या विहिरीचे कातळ यावर उडी मारताना हा बिबट्याचे डोके आदळले असावे आणि त्यामुळे बिबट्याच्या केवळ डोक्याला मार लागला होता.
सदर मृत्यू हा भक्ष्याचा पाठलाग करतांना रात्रीच्या वेळी विहिरीचा अंदाज न आल्यामुळे डोक्यावर पडून, बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला असून, मृत बिबटय़ाच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. या व्यतिरिक्त बिबट्या या प्राण्यास कोठेही इजा झालेली नाही. बिबट्याचे अवयव जागेवर असून, सदर मृत्यू मागे कोणताही घातपात झाला नसल्याचे निष्पन्न होत आहे.बिबट्याच्या अन्य कोणत्याही भागाला कोणत्याही स्वरूपातील जखम नव्हती.
ओवल फ़ाउंडेशन आणि यशवंती हॅकर्स यांचे ट्रेकर्स यांना वन विभागाने पाचारण केले आणि त्यांच्या माध्यमातून मृत बिबट्याला विहिरीतील बाहेर काढण्यात आले.त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ पंच आदी उपस्थित होते.मृत बिबट्याला नंतर पिंगळस येथील पशुवैदयकीय अधिकारी दवाखाना येथे शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.त्यावेळी मृत बिबट हा नर असून त्याचे वय साधारण तीन वर्षे असावे असे स्पष्ट झाले.