माथेरान/ संतोष पेरणे : राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला असून मुंबई आणि उपनगरीय परिसरात हवेत गारवा जाणवत आहे. अशातच आता सलग दोन ते तीन दिवस माथेरान आणि परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नेरळ माथेरान घाटात धुक्याची दुलई दिसून येत आहे.घाटातील ढगाळ वातावरणामुळे नेरळ माथेरान घाटात आणि माथेरान शहरात सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. अवकाळी पावसाने हिरवागार झालेल्या घाटरस्त्याला भेट देण्य़ास पर्यटकांची गर्दी होत आहे.
सोमवारी सायंकाळी माथेरान शहरात तर कर्जत तालुक्यातील बहुसंख्य भागात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आला होता.त्यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस आला.हा अवकाळी पाऊस संध्याकाळी चार वाजल्यापासून पुन्हा सुरू झाला आणि रात्री पर्यंत अवकाळी पाऊस बरसत होता.त्या सर्व पावसामुळे नेरळ माथेरान घाट रस्त्यात सर्वत्र धुक्याची दुलई पसरली होती.या धुक्यामुळे नेरळ माथेरान घाटातील झाडांमधून अंगावर येणारे धुके अनुभवण्यासाठी हौशी पर्यटक नेरळ माथेरान घाटात सैर करू लागले आहेत.त्याचवेळी त्या धुक्यातून येणारे जाणारी वाहने यांना गाडीच्या हेड लाईट चालू करूनच प्रवास करावा लागत होता.तर दुचाकी वरून जाणारे दुचाकीस्वार हे देखील धुक्यातून वाहने चालविण्याचा आनंद घेत आहेत.सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी नेरळ माथेरान घाटात निर्माण झालेली धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
माथेरान घाट तसेच माथेरान शहरात सर्व ठिकाणी अवकाळी पावसामुळे धुकेमय वातावरण तयार झाले आहे.त्यात माथेरान मध्ये असलेली झाडांची गर्दी आणि त्या झाडांमधून येणारे धुक्याचे लोट तसेच सर्वत्र निर्माण झालेले फोगी क्लायमेट यामुळे वातावरण आल्हादायक झाले आहे.दुसरीकडे माथेरान शहरात असंख्य ठिकाणी झाडांच्या पलीकडे धुके दिसून येत असल्याने रात्रीच्या अंधारात तर हे धुके प्रचंड आनंद देणारे ठरत आहे.रात्रीच्या अंधाराला दिव्यांच्या प्रकाशात धुक्याची दुलई वेगळे रूप धारण करीत असल्याने स्थानिक आणि पर्यटक आनंदले आहेत.मात्र अवकाळी पाऊस याने गेली काही दिवस वातावरणात निर्माण झालेला उष्मा कमी झाला असून गारवा अधिक वाढला आहे.