रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर, उपाध्यक्षपदी मधुकर पाटील बिनविरोध
Raigad News: रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) महायुतीने सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १६, भाजप १५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५, काँग्रेस २ जागांवर विजय मिळविला. अध्यक्ष पदासाठी भाजपचे मंगेश वाकडीकर व उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे दाखल केले.
त्यांच्या विरोधात इतर कुणीही अर्ज न भरल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अर्ज दाखल करण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार धैर्यशील पाटील, मानसी दळवी, आस्वाद पाटील, दिलीप भोईर, रसिका केणी, विकास गोगावले तसेच चित्रा पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर सुशासन संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अलिबाग शहर तसेच परिसरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरवर केवळ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पक्षचिंह व नेत्यांचे फोटो झळकत होते. यामुळे शिवसेना (शिंदे गट) सतेत वाटा मिळाला आला तरी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस कडून दूजाभाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. मात्र सत्तेत सहभागी असूनही शिवसेना (शिंदे गट) २१ सदस्यांपैकी केवळ ५ सदस्य उपस्थित राहिले. यामुळे प्रथम अध्यक्ष व उपाध्यक्ष पद न मिळाल्याने शिवसेना (शिंदे गट) सदस्य नाराज असल्याची कुजबुज रंगल्याचे चित्र दिसून आले.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणूक पूर्व भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती असल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र राज्य सरकारमध्ये एकत्र असल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेत आपल्याला सामावून घ्यावे यासाठी शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह इतर भाजप नेत्यांचे उंबरठे झिजविले.
या आधी २०१७ मध्ये शेकापचे २३ आणि राष्ट्रवादीचे १२ सदस्य निवडून आले. तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात रायगड जिल्हा परिषद होती. यंदा शेकापचा एकही सदस्य निवडून आला नसल्याने २०२६ मध्ये शेकापविरहित जिल्हा परिषद झाली. या निकालातून शेकापची शकले झाल्याचे स्पष्ट झाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सव्वा वर्ष शिवसेना अडीच वर्ष अध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरला. मात्र निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकूनही प्रथम शिंदे गटाच्या वाट्याला अध्यक्ष व उपाध्यक्ष पद आले नाही.






