माथेरान/संतोष पेरणे : पावसाळा आणि थंडीत माथेरानमध्ये पर्यटकांची कायमच गर्दी पाहायला मिळते. पर्यटनाच्या जोरावर स्थानिकांनी नवनवीन व्यापार सुरु केले आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची ने-आण करणाऱ्या टॅक्सी चालकांचा मनमानी कारभार सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. या टॅक्सीचालकांकडून नियम पाळले जात नसल्याने नेरळ पोलिसांनी कारवाई केली. याचपार्श्वभूमीवर संघटित असलेल्या टॅक्सी संघटनेने टॅक्सी बंद आंदोलन सुरू केले आणि त्यामुळे माथेरान येथून नेरळकडे येण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे हाल झाले. मात्र दोन तासानंतर पोलिस आणि टॅक्सी चालक यांच्या समन्वय यातून टॅक्सी वाहतूक बंद मागे घेण्यात आल्यावर टॅक्सीच्या प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.
रविवारी माथेरान घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी टॅक्सी चालक यांच्याकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी नेरळ पोलिस यांच्याकडे येत होत्या. नेरळ पोलिसांनी माथेरान नाका असलेल्या हुतात्मा चौकात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. स्वतः प्रभारी पोलिस अधिकारी तसेच तीन पोलिस अधिकारी यांनी पोलिस कर्मचारी यांच्यासह टॅक्सी चालक यांच्या वाहनाची कागदपत्र तसेच टॅक्सी चालक यांची फिटनेस चाचणी घेण्यास सुरुवात केली.त्यात काही टॅक्सी चालक दोषी आढळत असल्याने शेवटी नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटना यांनी टॅक्सी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
श्रावण महिना सुरू होण्याआधी येणारा शेवटचा रविवार असल्याने पर्यटकांची अलोट गर्दी माथेरान घाटात झाल्याने सकाळी नऊ पासून माथेरान घाट वाहतूक कोंडी सापडला होता.त्यात टॅक्सी चालक यांनी टॅक्सी सेवा बंद केल्याने पर्यटकांना आणखी त्रास होऊ लागला.पर्यटकांना चालत माथेरान घाट उतरण्याची वेळ आली आणि सलग दुसऱ्या रविवारी अशी घडत असल्याने प्रशासनाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र टॅक्सी सेवा बंद केल्यावर टॅक्सी चालकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे धाव घेतली आणि पोलिस करीत असलेल्या कारवाई बद्दल तक्रारी केल्या.त्यानंतर टॅक्सी चालक हे पोलिस स्टेशन येथे वाहने घेऊन थांबल्याने मोठी गर्दी पोलिस स्टेशन परिसरात दिसून येत होती.
शेवटी टॅक्सी चालकांनी पोलिसांच्या सूचनेनुसार दोन तासानंतर टॅक्सी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला.मात्र त्या सर्व प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यात आमदार महेंद्र थोरवे हे बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.तर टॅक्सी चालकांना ड्रेस कोड,वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे,मद्यपान करून वाहतूक करू नये,आदी नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.मात्र प्रचंड संख्येने आलेले पर्यटक आणि त्यानंतर दुपारनंतर निघालेले पर्यटक माथेरान येथून नेरळ येथे येण्यास निघाले.मात्र टॅक्सी बंद असल्याने पर्यटकांना माथेरान येथून नेरळ येथे चालत चालत घाट उतरत होते.त्यामुळे महिला आणि बाळ गोपाल यांचे हाल वाहतूक कोंडी आणि टॅक्सी सेवा बंद यामुळे झाले.