कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील गेली दीड वर्षे सुरू असलेली लाल माती तस्करी प्रकरणी मोठी कारवाई महसूल विभागाने केली आहे. महसूल विभागाने लाल माती घेऊन निघालेल्या हायवा गाडी मालकांचे हात बांधले असून त्या गाड्यांमधून पुन्हा अवैध गौण खनिज वाहतूक झाल्यास त्या गाड्यांची स्थिती बिकट होऊ शकते असे सत्य प्रतिज्ञापत्र ट्रक मालकांकडून लिहून घेण्यात आले आहेत. दरम्यान,अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या तीन गाड्यांवर महसूल उप विभागीय अधिकारी यांच्याकडून बॉण्ड लिहून घेण्याची कार्यवाही करण्यात आल्याने ट्रक चालक धास्तावले आहेत.
7 एप्रिल 2025 रोजी कर्जत तालुक्यातील लाल मातीच्या होणाऱ्या तस्करीचा महसूल विभागाने कारवाई करताना उघडकीस आणली होती.कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत रात्रीच्या अंधारात लाल मातीची तस्करी करणाऱ्या बारा गाड्या पकडल्या. त्यापैकी लाल मातीने भरलेल्या तीन गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या तीन गाड्यांना प्रत्येकी दोन लाख 23 हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र त्यानंतर या गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यासं या गाड्यांमधून होणारी वाहतूक ही अवैद्य होऊ नये याकरता तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी आणखी महत्त्वाची कारवाई केली आहे. महसूल विभागाकडून त्या ट्रकवर वेगवेगळ्या दोन कारवाया होत असतात.त्यात तहसीलदार यांच्याकडून बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंडाची कारवाई होते. त्या कारवाईत साधारण दहा लाखाचा दंड महसूल विभागाने तत्काळ वसूल केला.मात्र त्यानंतर देखील त्या तीन ट्रक मालक यांना त्यांचे ट्रक ताब्यात मिळाले नव्हते. ट्रक ताब्यात घेण्यापूर्वी महसूल विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कबुली जबाब सत्य प्रतिज्ञापत्र म्हणून लिहून घेतला जातो.
महसूल विभागाकडून करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाई नंतर प्रांत अधिकारी यांच्याकडून त्या ट्रकमधून पुन्हा बेकायदा आणि अनधिकृतपणे गौण खनिज यांचे उत्खनन यांची वाहतूक होणार नाही यासाठी ते बॉण्ड लिहून घेतले जातात. कोणत्याही गौण खनिज बेकायदा वाहतुकीमध्ये प्रांत अधिकारी यांच्याकडून केली जाणारी कारवाई महत्वाची असते.अवैध वाहतूक रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये गाडी आणि गाडी मालकांना मोठा धक्का बसला आहे.कर्जत तालुक्यातून होणाऱ्या लालमातीच्या तस्करी प्रकरणात पकडण्यात आलेल्या त्या तीन हायवा गाड्यांवर देखील बॉण्डची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये तीनही गाड्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यानंतर येणाऱ्या 30 दिवसांमध्ये जर पुन्हा या गाड्यांमधून अवैद्य वाहतूक आढळल्यास लाखो रुपये किमतीच्या या गाड्या स्क्रॅपच्या भावाने जप्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता अवैद्य धंदा करून लाल मातीची चोरटी वाहतूक करणाऱ्या या माती तस्करांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.दरम्यान, तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी केलेल्या कारवाई नंतर कर्जत तालुक्यातील होणारी लाल मातीची तस्करी काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. महसूल विभागाला कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता अवैधपणे होणारा माती उपसा आणि त्याची वाहतूक ही पुन्हा येत्या काळात सुरू होऊ शकते अशी शक्यता देखील नाकारता येत नाही.
याच गोष्टीला आळा बसावा याकरता कारवाई करण्यात आलेल्या तीन गाड्यांवर डॉ धनंजय जाधव यांनी तीनही गाड्यांवर बॉण्डची कारवाई केली आहे. आता या तीन गाड्या रस्त्यात बेकायदा वाहतूक करताना आढळल्यास त्या थेट जप्त केल्या जाणार आहेत. यामुळे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या कारवाईनंतर माती तस्करांचे आणि अवैद्यपणे वाहतूक करणाऱ्या गाड्या मालकांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे करार ?
वाहन मालक यांच्याकडून प्रांत अधिकारी यांनी सत्य प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असून त्यावर १२ जानेवारी २०१८चे राजपत्र नुसार वाहतूक करताना त्या गाड्यांमधून अनधिकृत गौण खनिज काढण्यासाठी,ते गौण खनिज त्या जागेवरून दुसऱ्या जागी हलविण्यासाठी,गौण खनिज गोळा करण्यासाठी, दुसऱ्या जागी उचलून नेण्यासाठी किंवा त्या गौण खनिज यांची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्यांची वाहतूक करता येत नाही.