Raigad: जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस; वेळेत उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू
पेण (विजय मोकल) : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांतील आदिवासी बांधव रस्त्याच्या शोधात आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून खवसावाडी साठी 60 लाख रुपये निधी मिळूनही रस्त्याचे काम झाले नसल्याचे उघड झाले आहे. तसेच उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जानेवारी 2024 मध्ये 7.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्याचे काम न झाल्याने रस्ता गेला कुठे असा प्रश्न आदिवासी बांधव करीत आहेत.
याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आदिवासींच्या मूलभूत हक्कांचे उघडपणे उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ डोळेझाक करत आहे. ही निष्क्रियता असह्य असून, या गंभीर प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
खवसावाडीतील आंबि राघ्या कडू या महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. हा प्रकार मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला असल्याचा आरोप संतोष ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणी संतोष ठाकूर, अॅड. सिद्धार्थ इंगळे यांच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत तथ्य शोध अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जानेवारी 2024 मध्ये 7.22 कोटींचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी घेतला. मात्र, वर्क ऑर्डरची मुदत संपूनही अद्याप काम सुरू झालेले नाही.या अन्यायाविरोधात नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवावा, जेणेकरून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळू शकेल. असे संतोष ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
या पत्रकार परिषदेला संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, ऍड. एडवोकेट सिद्धार्थ इंगळे, ऍड. विकास शिंदे, नंदकुमार पवार, पाच वाड्यातील ग्रामस्थ प्रतिनिधी यशवंत खाकर, सुनील वाघमारे, काल्या कडू, गीता वाघमारे, पल्लवी खाकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजेश रसाळ, सचिन पाटील यांच्यासह आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते.