कर्जत/ संतोष पेरणे : शासन आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन अधिकारी वर्गाने शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायला हवे.आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले होते.त्यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला.
कर्जत आपत्तकालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपविभागीय अधिकारी डी. डी. टेळे,तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील,पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, कर्जत पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर,प्रदीप चव्हाण,उमेश जंगम,कृषी अधिकारी शिंदे,सहाय्यक निबंधक शरयू सामंत,पोलिस अधिकारी तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दर महिन्याला आपण आपत्ती कालीन व्यवस्थापन समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला जाईल असे आमदार थोरवे यांनी जाहीर केले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारी वर्गाशी बोलताना समाजामध्ये शंका आणि अपप्रचारांचे वातावरण पसरवले जात आहे. अनेक अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जात आहे.कोणत्याही अधिकाऱ्याने अशा दबावाला बळी पडू नये. अशा प्रकारांना या मतदारसंघात थारा दिला जाणार नाही. शासन व प्रशासन जेव्हा एकत्र येते, तेव्हाच विकासाला गती मिळते. आपण सर्वांनी ‘टीमवर्क’च्या माध्यमातून काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडून येतील.
या बैठकीत विविध विभागांनी आपापल्या अडचणी व प्रगती अहवाल मांडले.त्यात प्रामुख्याने वन अधिकाऱ्यांनी पळसदरीतील दरडींचा धोका अधोरेखित केला असता तहसीलदारांनी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्या दरडी हटविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामे असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे धान्य एकत्र आणले जाणार असल्याची माहिती दिली.पावसाळ्यामध्ये पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजना करून पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली.कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.