कल्याण/ स्नेहा जाधव काकडे : वाढत्या लोकसंख्य़ेमुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होत आहे. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्की नाका येथे मागील काही दिवसांपासून सिग्नल बंद अवस्थेत आहे. यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, रस्त्यावरील प्रवास अतिशय त्रासदायक बनला आहे.
वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालक, पादचारी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर शिस्त नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 19 (फ) नुसार सार्वजनिक वाहतुकीचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवाह राखणे आवश्यक आहे. या अनुषंगाने, चक्की नाका परिसरातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी वाहतूक विभागाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
*वाहतूक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करावी.
*वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करावेत.
*वाहनचालकांसाठी सूचना फलक (साइनबोर्ड्स) लावण्यात यावेत.
या परिस्थितीकडे वाहतूक विभागाने गांभीर्याने पाहून, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी सर्व नागरिक, स्थानिक व्यापारी, शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थांची कळकळीची मागणी आहे.
जर वेळेत कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुढील आंदोलनात्मक भूमिका घेतली जाऊ शकते, असा इशाराही कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा संघटक तात्यासाहेब माने,उप जिल्हाप्रमुख श्री राहुल भगत,श्री सदाशिव गायकर,विधानसभा संघटक श्री विजय भोईर,तालुकाप्रमुख भगवान शांताराम पाटील, तालुका संघटक,भालचंद्र म्हात्रे,उप तालुकाप्रमुख,परेश पाटील,मुकेश नाना भोईर, किरण पाटील,धनंजय गायकर युवा सेना,विभागप्रमुख नागेश पवार आदी उपस्थित होते.