मनसेप्रमुखांचा 'राज'कीय प्रवास, शिवसेना सोडून का निर्माण केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना! (फोटो सौजन्य-X)
Raj Thackeray Birthday News in Marathi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 57 वा वाढदिवस आहे. उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्वामुळे राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून ते त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे. राज ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाच घेतलेला हा आढावा.
२००३ मध्ये महाबळेश्वर येथे शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यात शिवसेना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणार निर्णय घेण्यात आला. त्याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मुख्य म्हणजे उद्धव यांचे सख्खे चुलत भाऊ आणि पक्षनेतृत्वाचे शर्यतीतले एकमेव दावेदार राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांचा नावाचा प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असतील असे संकेत आधीच मिळाले होते. राज यांनी स्वतःहून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेची धुरा हळूहळू उद्धव ठाकरेंच्या हाती आली.
महाबळेश्वर अधिवेशनानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फारसं स्थान मिळालं नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या अनेक समर्थकांची तिकिटे कापण्यात आलं, अशी चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना पक्षात अस्वस्थ झाले. त्यानंतर २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे कोणत्याही पक्षात सामील झाले नाही. त्याऐवजी, ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याबाबत केलेले भाषण लोकांना अजूनही आठवते. लोकांना अजूनही त्यांचे शब्द आठवतात की, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या सभोवतालच्या बडव्यांशी आहे.
मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरुवातीला निळा, भगवा आणि हिरवा रंगांचा झेंडा आणला. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला. मनसेला तरुणांनी मोठा प्रमाणात प्रतिसाद दिला. मराठी लोकांच्या कल्याणाचा विचार करणारी बाजू, शिवसेनेची असलेली ओळख पुसून ती जागा मनसेला कशी मिळेल, या दृष्टीने राज ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माणातून १३ आमदार निवडून आले. त्यानंतर मनसेला पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करता आली नाही. नेहमीच लोकांना आकर्षित करणारे राज ठाकरे त्यांचे मतांमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले. मनसे प्रभावाचे क्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकच्या पलीकडे गेले नाही. त्यातच सतत बदललेल्या राजकीय भूमिकांमुळे राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष सर्वसामान्यांच्याही आलोचनेचा विषय ठरला.