सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी : गेल्या आठ दिवसापूर्वी शाहूवाडी तालुक्याचे तहसिलदार रामलिंग चव्हाण यांच्या नावे पाच लाख रुपयांची लाच घेताना खासगी एजंटाला रंगेहात पकडण्यात आले होते. मात्र यातून तहसीलदार चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न लातूर प्रतिबंधक विभागाने केल्याचा आरोप स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. तहसीलदार चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात नेमकं काय म्हटलंय?
तहसीलदार चव्हाण यांच्या भ्रष्ट्र कार्यपध्दतीबाबत यापूर्वी अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामधील अनेक गोष्टी या गंभीर असून, प्रशासनाकडून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. यापध्दतीने भ्रष्ट कारभाराचे प्रकार घडत असताना प्रशासनाकडून विविध माध्यमातून या गोष्टीवर पांघरून घालण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. भ्रष्ट कारभार नुसत्या शाहूवाडी तालुक्यात सुरू नसून जिल्ह्यासह व राज्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालयात यापध्दतीनेच कारभार सुरू आहे. गावातील तलाठी, ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापासून मंत्रालयातील सचिवापासून ते मंत्र्यापर्यंत नियमीत असणाऱ्या कामातही त्रुटी काढून सावज शोधून कसाई सारख्या भूमिकेत कारभार प्रशासन व राज्यकर्ते सामान्य जनतेची पिळवणूक करीत आहेत. या कारभारास तहसिलदारांबरोबरच संबधित जिल्ह्यातील व राज्यातील आमदार खासदार व लोकप्रतिनिधी जबाबदार असून, त्यांचा कोणताच धाक प्रशासनावर राहिलेला नाही.
गगनाला भिडलेले बदल्यांचे दर, बगलबच्यांमार्फत होत असलेले अवैद्य धंदे, नियमांचे उल्लंघन करून केलेली कामे यामधून सामान्य जनतेच्या गळ्यास भ्रष्टाचाराची सुरी लावली जात आहे. नियमात बसत असलेल्या कामानांही पैसे न दिल्यास शेकडो हेलपाटे मारावे लागत आहेत. शाहूवाडी तालुका हा डोंगराळ आहे. धनगरवाड्यातील लोक चालत तहसील कार्यालयात कामासाठी येतात. मात्र दिवसभर त्यांना ताटकळत ठेवून परत पाठविले जाते.
पैशाच्या वसुलीसाठी लाचेची मागणी
मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा दर वधारल्याने बदलीसाठी दिलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी कुणालाही न जुमानता राजरोसपणे भ्रष्ट कारभार केला जात आहे. तहसिलदार रामलिंग चव्हाण हिमनागाचा एक टोक आहे. संबधित पंटर खोत यांच्याविरोधात झालेल्या गुन्ह्यांत पंटर सुरेश खोत यांनी तहसिलदारांना पैसे देत असल्याचे सांगून शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही तहसिलदार रामलिंग चव्हाण यांच्यावर ॲन्टी करप्शन विभागाने कोणतीच कारवाई केलेली नाही. यामुळे शाहूवाडी तहसिलदार रामलिंग चव्हाण यांनी केलेल्या कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसीबीकडून पाठराखण?
लाच घेताना एखादा वरीष्ठ शासकीय अधिकारी सापडला तर कनिष्ठाला बकरा करून वरिष्ठाला वाचविण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेक प्रकरणात एसीबीकडून झाल्याची चर्चा आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात तक्रार केल्यानंतरच एसीबी त्या अधिकाऱ्यांवर पुन्हा तक्रार दाखल करते, मग एखाद्या तक्रारीची एसीबीला वाट का पहावी लागते ? हा देखील एक संशोधनाचा विषय आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.