Ramdas Kadam
मुंबई : देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘अजित पवार मागच्या दाराने सत्ताधारी महायुतीत सामील झाले असून, राष्ट्रवादीचे नेते काही दिवस आले नसते तर बरे झाले असते’, असे त्यांनी म्हटले.
रामदास कदम यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, ‘अजित पवार मागच्या दाराने सत्ताधारी महायुतीत सामील झाले असून, राष्ट्रवादीचे नेते काही दिवस आले नसते तर बरे झाले असते. महायुतीत जागावाटप लवकर झाले असते आणि आम्हाला 15 जागा दिल्या असत्या तर शिवसेनेला 13 किंवा 14 जागा जिंकता आल्या असत्या. जागावाटपात झालेल्या दिरंगाईमुळेच आमच्या पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला’, असा आरोपही कदम यांनी केला.
रामदास कदम यांच्या विधानावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार करत अजित पवार वेळेवर आल्याने तुम्ही वाचला, अन्यथा तुम्हाला हिमालयात जावे लागले असते, असे प्रत्युत्तर दिले.
काही उमेदवार आमच्यावर लादले
तसेच ते पुढे म्हणाले, ‘सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. पण भाजपच्याही जागा पडल्या?, भावना गवळी, हेमंत गोडसे नको असे भाजपचे मत होते. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का?’, असा सवालही त्यांनी यावेळी केला.