संग्रहित फोटो
मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या काही दिवसांतच निवडणुका जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाच महायुतीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना (एकनाथ शिंदे) जागावाटपावरून चर्चा सुरु झाली आहे. यावरून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे. ‘जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा होईल. वैयक्तिकरित्या अद्याप निर्णय झालेला नाही’, असे त्यांनी सांगितले.
दानवे म्हणाले, भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. भूपेंद्र यादव, आणि अन्य नेते बैठकीला उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ गोव्यासह मुंबईच्या जागांची चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत एकूण राजकीय परिस्थिती, मित्र पक्ष आणि निवडणूक मित्रांसोबत लढण्याची चर्चा झाली. आमच्या मित्र पक्षांसह 288 जागा आम्ही लढावणार आहोत. आमचे नेते आणि घटकपक्ष एकत्र बसून फॉर्म्युला ठरवणार आहोत. भाजप महाराष्ट्रचा विचार करणारा पक्ष आहे. 288 मतदारसंघांचा आम्ही अभ्यास केला आहे, अस भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
यावेळी दानवे यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत सकाळी सांगतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील त्यांना शांत करतात. त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात. आणि यानंतर गळ्यात रुमाल बांधून भावी मुख्यमंत्री नाना पटोले काही तरी बोलतात, असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी काढला. महाविकास आघाडी मध्ये काही अलबेल नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
सांगलीच्या जागेवरून किती वाद झाले हे माहित आहे सगळ्यांना. सांगलीत काँग्रेसने बंडखोरी केली. जनतेने कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली. शेतकरी, युवक असे विकास कामांचा अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला. या सगळ्या जनहिताच्या योजना आहेतय सभागृहात यावर टीका करायची आणि आपल्या मतदारसंघात होर्डिंग लावायचं, अशी दुटप्पी भूमिका हे नेते घेत आहेत, असल्याचे ते म्हणाले.