फोटो सौजन्य: गुगल
मुंबई गोवा महामार्गावर सततच्या अपघातांमुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या महागार्गावरील दोन ठिकाणी कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री सव्वा दहा च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील वळणावर कंटेनर पलटी झाला. भीषण अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर यांना वाचविण्यात यश आले असून अपघातात दोघांना गंभीर मार लागला आहे. काहीच वेळात कंटेनर ला भीषण आग लागली .घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस स्टेशन मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे,पोलिस नितेश राणे,शिवाजी कळंत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदकुमार सुर्वे यांनी आपला पाण्याच्या टँकर उपलब्ध करून दिला .तसेच महामार्ग ठेकेदार कडून टँकर उपलब्ध करून देण्यात आला तसेच राजापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजापूर अग्निशमन दलाचे ड्रायव्हर राजू कणेरी,फायरमन अशोक गार्डी, वैभव कांबळी वाकेड पोलिस प्रशांत भितले,सरपंच संदीप सावंत, जिजाई संस्थेचे योगेश पांचाळ,महेश देवरुखकर,जयवंत जाधव,पाटील, नंदकुमार सुर्वे,राजू जाधव,मंगेश लाजेकर,मिलिंद गुरव, शिवा उकली, विवेक कनावजे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आगीत कंटेनर जळून खाक झाला आहे.
लांज्याप्रमाणेच गोवा महामार्गावरील जानवली येथे केसीसी बिल्डकॉनच्या उभ्या असलेल्या टॅंकरला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेरनचा एकाबाजूचा भाग कापला गेला. तर टॅंकर मुंबईच्या दिशेने फिरून पटली झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातानंतर कंटेनरमधील भाजीपाला सर्वत्र विखुलेला होता. महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. याबाबत उपलब्ध माहितीनुसार, जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी केसीसी बिल्डकॉन कंपनीचा टॅंकर हा महामार्गवर लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी उभा होता. यावेळी टॅंकर चालकाने लाल कलरचे बॅरीकटिंगदेखील केले होते. याच दरम्यान गोव्याच्या दिशेने जाणारा भाजी वाहतूक करणारा कंटेनर वेगाने उभ्या असलेल्या टॅंकरला जोरदार धडक दिली.
या धडकेत कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग कापून जात आतील भाजी-फळे ही महामार्गावर विखुरली गेली होती. कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने यात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. अपघातानंतर वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्यासह कणकवली व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी वाहतूक पोलीस प्रकाश गवस, महामार्ग पोलीस विजय देसाई, सानप जगताप, संतोष कराळे, प्रवीण पार्सेकर आदी उपस्थित होते. अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले.