इटलीतील या कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी करून येथे वापरात आणणार असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविषयी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
‘मिटेनी’ कंपनी इटलीतील व्हेनेटो प्रांतात पीएफएएस या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन करत होती. ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जाणारी ही रसायने निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. या उत्पादनामुळे येथील सुमारे साडेतीन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परिणामी कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले.
या गंभीर प्रकरणानंतर 2018मध्ये कंपनी दिवाळखोर ठरली होती. त्यानंतर जून 2025 मध्ये इटलीतील न्यायालयाने या कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना एकूण 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. असे असताना ही हा प्रकल्प आता लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुरु करण्याचा घाट राज्य शासनाच्या मदतीने घातला जात असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, लक्ष्मी ऑरगॅनिक्सने 2019 मध्ये लिलावाद्वारे ‘मिटेनी’ची संपूर्ण यंत्रणा, तंत्रज्ञान आणि पेटंट्स खरेदी केल्याचे समोर आले आहे. इटलीतील कारखाना सुटा करून सुमारे 300 हून अधिक कंटेनर्समधून ही यंत्रसामग्री भारतात आणण्यात आली, अशी माहिती देण्यात येत आहे. हीच यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत ‘यलोस्टोन फाईन केमिकल्स’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात वापरली जात असल्याचा दावा पर्यावरण संघटनांकडून केला जात आहे. 2025 च्या सुरुवातीपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.
खेड तालुक्यातील लोटे परशुराम परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएस सारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही रसायने एकदा पाण्यात मिसळली की साध्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे वेगळी करता येत नाहीत. ती मानवी रक्तात साठून राहतात आणि कर्करोग, थायरॉईड विकार, गर्भवती महिलांमधील गुंतागुंत यांसारख्या समस्या निर्माण होतात.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात पीएफएएस रसायनांबाबत स्वतंत्र व कठोर प्रदूषण मर्यादांचा अभाव असल्याने, भारत ‘टॉक्सिक ट्रेड’चा बळी ठरत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. या बाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांबरोबर आता भारतातील सोशल मिडीयाने युरोपमधून हद्दपार झालेले प्रदूषक उद्योग विकसनशील देशांकडे स्थलांतरित होत असल्याचा मुद्दा उचलून धरल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक, पर्यावरण संस्था आणि कायदेपंडितांकडून या प्रकल्पाच्या पुनरावलोकनाची मागणी होत असून, केंद्र व राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.लोटे येथील या कंपनीचे सद्यस्थितीत काम बंद आहे. या कंपनी विषयी प्रदुषण मंडळाचा अहवाल आल्यावरच राज्य शासनाकडून पुढील निर्णय घेतला जाईल असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
Ans: पीएफएएस ही ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जाणारी रसायने आहेत. ती निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. यामुळे कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व, थायरॉईड समस्या यांचा धोका वाढतो.
Ans: मिटेनी’च्या उत्पादनामुळे सुमारे 3.5 लाख नागरिकांचे पिण्याचे पाणी दूषित झाले. यानंतर 2025 मध्ये इटलीतील न्यायालयाने कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना एकूण 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
Ans: भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने 2019 मध्ये ‘मिटेनी’ची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स लिलावाद्वारे खरेदी केली.






