फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांपासून सतत “सर्व्हर डाऊन” असल्याने आदिवासी खातेदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवार ४ जुलैपासून बँकेने ‘सर्व्हर डाऊन’ असल्याचे कारण पुढे करत ग्राहकांची अडवणूक सुरू ठेवली असून, सोमवार ७ जुलै रोजीही हीच परिस्थिती कायम होती. या बँकेत अनेक आदिवासी शेतकरी शेतीचे काम मोडून व्यवहारासाठी येतात. घरकुल लाभार्थी, वयोवृद्ध, निवृत्त कर्मचारी आणि इतर अनेक कारणांनी खातेदारांचा बँकेवर मोठा राबता आहे. मात्र, बँक प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि टाळाटाळीमुळे ग्राहकांची त्रासदायक ससेहोलपट सुरू आहे. अनेक खातेदार बँकेत हेलपाटे घालत आहेत, पण त्यांना समाधानकारक सेवा मिळत नाही.
मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी थेट आयडीबीआय बँकेच्या महाव्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाघ यांनी सांगितले की, बँकेने अर्थिंग नसल्याचे कारण सांगत जबाबदारी झटकली, पण सततची ही अडचण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही बँकेची जबाबदारी आहे.
तसेच, भाषेचा मुद्दा देखील मोठ्या अडथळ्याचे कारण ठरत आहे. आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात बहुतेक नागरिक आदिवासी बोलीभाषा बोलतात. परंतु बँकेतील कर्मचारी इतर भाषिक असून, त्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान नाही. यामुळे खातेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव निर्माण झाला आहे.
या प्रकरणात पत्रकार नामदेव ठोमरे यांनी चौकशीचा प्रयत्न केला असता, त्यांनाही “ओळखपत्र असल्याशिवाय माहिती मिळणार नाही” अशी उर्मट वागणूक देण्यात आली. हे चित्र सरकारी सेवांबाबत लोकांच्या मनात असलेल्या नाराजीचेच प्रतिनिधित्व करते. सरतेशेवटी, आदिवासी खातेदारांना सन्मानपूर्वक आणि सुलभ सेवा मिळण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या स्थानिक शाखेने तत्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा सामाजिक आणि आर्थिक अन्याय ठरेल.






