वादळी पावसाचा तडाखा; घरांचे छप्पर उडाले; संसार उघड्यावर (संग्रहित फोटो)
वाशिम : राज्यातील काही भागांत पाऊस होताना दिसत आहे तर काही ठिकाणी अद्यापही प्रतिक्षाच आहे. अनेक भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला आहे. तर वाशिमच्या रिसोड तालुक्यात देखील वादळी वाऱ्याचा प्रभाव पाहिला मिळाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेली असून, मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबांचं नुकसान झाले आहे.
आसेगाव पेन येथील चव्हाण कुटुंबावर घराचे संपूर्ण छत कोसळून पडल्याने अख्ख कुटुंब या छताखाली दबले होते. यात दोन जण जखमी सुद्धा झाले आहेत. राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे. त्यानुसार वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वादळी वाऱ्याने आसेगाव पेन, बेलखेडा, व्याड या परिसरातील अनेक घरांची टिनपत्रे उडून नुकसान झाल आहे. अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहे. छताखाली कुटुंब दबले गेल्याने दोन जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर शुकवारपासून पाऊस जोर पकडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वीज पडून गोठ्याला लागली आग
जांब आढाव गावात बुधवारी सायंकाळी विष्णू भानुदास जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये गोठ्यात ठेवलेले कृषी पंप, पाईप, केबल आणि जनावरांचा चारा जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगावला वादळी पावसाने झोडपले
जळगाव शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे व वादळामुळे शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. तर काही भागात वीज खांब वाकले.