मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मुंबईमधील(jarange in mumbai) आंदोलनावर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जरांगे पाटील यांना आझाद मैदानाची (Azad Maidan) परवानगी नाकारली आहे. यानंतर देखील जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये धडकणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) भेट घेतली आहे. जरांगे यांच्या मदतीला रोहित पवार धावून आले आहेत.
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आता आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या मैदानांची क्षमता कमी असून जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन करता येणार नाही, असं म्हटलं आहे. पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावल्यानंतर रोहित पवार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात जात पोलीस आयु्क्त विवेस फणसाळकर यांची भेट घेतली. यावेळी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी जागा करुन द्यावी, अशी विनंती केली. “मराठा बांधव लाखोंच्या संख्येने येत आहेत, त्यांची योग्य सोय शासनाकडून झाली पाहिजे. महिला येत आहेत, त्यामुळे पोलिसांची सुरक्षा असली पाहिजे, अशी विनंती केली. पण महापालिकेकडे सरकारकडून अजून कोणतीही सूचना आलेली नाही. पोलीस आयुक्तालयातून जागा बदला असं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांचे समन्वय आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरु आह. तेच निर्णय घेत आहेत. पण जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोक येत आहेत. त्यांची सुविधा झाली पाहिजे” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या पोलिसांच्या नोटीस मध्ये काय लिहिले आहे?
आझाद मैदानाची शमता कमी असल्यामुळे या मैदानाची परवानगी नाकारली तरी देखील मैदानावर उपोषणाची तयारी सुरु आहे. हे स्टेज हटवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी नोटीसमध्ये लिहिले आहे की, आझाद मैदानाची क्षमता 5 ते 6 हजार असल्याने तिथे सोयी-सुविधा होणार नाहीत. त्यामुळे आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे विनापरवानगी आंदोलन केल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल. शिवाजी पार्कवर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा सरकारी पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. आंदोलनामुळे शिवाजी पार्कवरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण होऊ शकतो. एवढच्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांना सामावून घेण्याची शिवाजी पार्क मैदानाची क्षमता नाही. मुंबईत आंदोलक लाखोंच्या संख्येत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईतील सार्वजनिक सुव्यवस्था, अत्यावश्यक सेवा आणि रुग्णांची हेळसांड होऊ शकते. आंदोलन अनिश्चितकालीन असल्याने आवश्यक सोयी दीर्घकाळासाठी मुंबईत पुरवणे शक्य होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी योग्य जागा आपणास कळवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेक्टर 29, खारघर नवी मुंबई हे मैदान आपल्यासाठी संयुक्तिक राहिल. खारघर येथे आंदोलनासाठी आपण नवी मुंबईच्या संबंधित प्राधिकरण्याची परवानगी घ्या, असे आदेश पोलिसांनी नोटीसमधून जरांगे पाटील यांना दिले आहेत.