रोहित पवार : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर शब्दांचे टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. आमदार रोहित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर विश्वास ठेवून मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपदे आपल्याला मिळाली होती. आपल्या सर्वांना मंत्रीपद मिळावे, म्हणून आपल्या पक्षाने त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडलं’, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे रोहित पवार म्हणाले, प्रत्यक्षपणे आपण कसे चुकलो आहोत, हेच प्रफुल्ल पटेल यांना सांगत आहोत. प्रफुल पटेल भविष्याचे पुस्तक लिहिणार आहेत, त्या पुस्तकात त्यांनी शरद पवार यांनी विश्वास टाकल्यामुळे पार्टीचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झालं, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहावं, असा सल्लाही रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला. आमदार रोहित पवार यांनी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आता या विषयावर राजकारण न करता हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक तसेच ज्या ठिकाणी संधी देता येईल, त्या ठिकाणी शरद पवार यांनी सर्वांना संधी दिली. २०१४ मध्ये शरद पवार यांनी कुणबी समाजासाठी घेतलेला निर्णय हा सुद्धा महत्वपूर्ण ठरला असे रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीबाबत बोलताना म्हटले की, नरेंद्र मोदी यांना मदत करण्यासाठी मग इतर पक्ष का लागत आहे. लोकांनाच भाजप नकोसे झाले आहे आणि लोकांना ही नकोसे झाल्यामुळे हे भाजपला समजल्यामुळे भाजप घाबरले आहेत. इंडिया आघाडी मजबूत होत आहे. सततच्या बैठकांमुळे भाजप दहशतीत आहे. तत्पूर्वी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील बैठक चांगली झाली. पाच समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजप घाबरला आहे. त्यामुळे केंद्र सरकार विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत बोलत असल्याचे ते म्हणाले.