भिगवण : भिगवण बारामती राज्यमार्गावर होत असलेल्या जीवघेण्या ऊस वाहतुकीसंदर्भात बातमी प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या आरटीओ विभागाने कारवाईची मोहीम राबविली. यात ओव्हरलोड वाहने,विना पासिंग, विना परवाना तसेच विना रिप्लेकटर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिली.
भिगवण – बारामती रस्त्यावर उस वाहतूक वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तर या जीवघेण्या ऊस वाहतुकीमुळे अनेकांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत होता. याच गोष्टींची दखल घेत दै. नवराष्ट्रने बातमी प्रसिद्ध केली होती. या नंतर बारामती आरटीओ विभागाला जाग आली. या विभागाने कारवाईसाठी पथकाची निर्मिती करीत तपासणी मोहीम राबविली. यात मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे, सहायक मोटार वाहन निरीक्षक हर्षदा खारतोडे, प्रियांका सस्ते आणि चालक विठ्ठल गावडे तसेच महादेव तनपुरे यांच्या पथकाने भिगवण बाजार समिती, मदनवाडी चौक आणि मदनवाडी घाटात उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत कारवाई केली. यात विना परवाना, विना रीप्लेकटर तसेच ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तर मदनवाडी घाटात २० ते २५ वाहनांना सूचना करीत सर्व कागदपत्रे तसेच वाहन परवाना जवळ बाळगण्याच्या सूचना केल्या. तसेच मदनवाडी घाटात ट्रेलरसाठी रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आलेली दगडे उचलून बाजूला करीत रस्ता मोकळा केला.
-कारवाईच्या धास्तीने वाहने थांबली रस्त्यावर
दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई भिगवण येथे सुरु झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अनेक वाहन धारकांनी असेल त्या जागेवर आपली वाहने थांबवून ठेवली. शेवटी कारवाई करणारे पथक गेल्यावरच वाहने रस्त्यावर आणली गेली. आरटीओ पथक बारामतीपर्यंत पोहोचले का याची खात्री करून घेऊनच वाहने रस्त्यावर आणली.
[blockquote content=”बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्व साखर कारखान्यांवर शेती अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. तसेच परिवहन कार्यालयाकडून कॅम्प आयोजित करण्यात येत असून सर्व चालकांनी वाहन परवाने काढून घेण्याचे आवाहन केले. तसेच विभाग अपघात शून्य होण्यासाठी वेळोवेळी कारखाना आणि मार्गावर तपासणी करून ओव्हरलोड वाहतूक, वाहनाचे पासिंग, चालकाचा परवाना तसेच परावर्तक बसविण्याच्या सुचना केल्या जात आहेत. दंडाची कारवाई करण्याऐवजी जनजागृती करून अपघातांची संख्या कमी करणे हा बारामती परिवहन विभागाचा मुख्य हेतू आहे. ” pic=”” name=”- राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.”]






