संग्रहित फोटो
पुणे : महाराष्ट्रातील महसुली गावांपैकी १७ गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी (दि.१२ ऑगस्ट) केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या आता २७ हजार ९६८ इतकी झाली आहे. नवीन ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यातील नवीन ग्रामपंचायतींमध्ये बारामती तालुक्यातील ढाकाळे व खामगळवाडी, जुन्नर तालुक्यातील एडगाव व भोरवाडी, दौंड तालुक्यातील गार, बेटचीवाडी आणि मवीनगार यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात नव्याने स्थापन आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे विभागातील सात, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा, कोकण व नागपूर विभागातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यानुसार पुणे विभागात येत असलेल्या पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींसह कोकण विभागातील रत्नागिरी जिल्हा व याच तालुक्यातील चिंद्रवली व उमरे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती व रामपुरा व जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक व कुरण, बदनापूर तालुक्यातील हिवराळा व हनुमाननगर आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पोटा आणि चनकापूर या गावांसाठी नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत.
या नवीन ग्रामपंचायतींच्या स्थापनेला ग्रामविकास व पंचायतराज विभागाने मंजुरी दिली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २४३ (खंड छ) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ४ नुसार या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश राजपत्रात प्रकाशित करण्यात आला आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे या सर्व गावांच्या विकासाला आता गती येऊ शकेल, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा : तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन, तरुणावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यात आता एकूण १३९३ ग्रामपंचायती
पुणे जिल्ह्यात पुर्वी एकूण १४०४ ग्रामपंचायती होत्या. त्यात आणखी चार नवीन ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या १४०८ झाली होती. परंतु, यापैकी ३४ ग्रामपंचायती पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने हीच संख्या १३७० झाली होती. त्यात पुन्हा नवीन ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या १३८६ वर पोहोचली होती. या १३८६ मध्ये आणखी नवीन सात ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या आता १३९३ झाली आहे
हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! केकमध्ये आढळल्या अळ्या, नागरिक संतापले; पोलिसांनी बेकरी केली सील