संग्रहित फोटो
पुणे : पुणे- सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथील राजधानी बेकरीमध्ये विक्रीस असलेल्या केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेफिकीर व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक महिलेने आपल्या लहान मुलांसाठी राजधानी बेकरीतून केक खरेदी केला. घरी गेल्यानंतर केक कापल्यावर त्यामध्ये आळ्या असल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पालक व नागरिकांनी बेकरीवर धाव घेत तीव्र निषेध व्यक्त केला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले.
बेकरीमधील केक व इतर खाद्यपदार्थ ताब्यात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती दिली. प्राथमिक कारवाई म्हणून बेकरी तात्काळ सील करण्यात आली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन (FDA) केकचे नमुने तपासून अहवाल तयार करेल. अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून बेकरी मालकावर कठोर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया
परिसरात या घटनेची मोठी चर्चा रंगली असून, पालक संघटनांनी अन्नसुरक्षा विभागाने अशा बेकऱ्यांची नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे. काही स्थानिकांनी आरोप केला की, “अन्न फुड अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यावर तक्रार नोंदवल्याशिवाय कारवाई होणार नसल्याचं बेजबाबदार उत्तर मिळालं. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणे असह्य आहे.”
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांकडून 2038 पर्यंतचे नियोजन; वाहतुकीचा वेग कसा वाढणार?
पुण्यात क्रीम रोलमध्ये गुटख्याची पुडी
गेल्या काही दिवसाखाली पुण्यात अन्न सुरक्षेच्या नियमांना धाब्यावर बसवणारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. स्थानिक बेकरीतून विकत घेतलेल्या क्रीम रोलमध्ये गुटख्याची पुडी सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पुण्याच्या एका रहिवाशाने आपल्या मुलासाठी जवळच्या प्रसिद्ध बेकरीमधून क्रीम रोल विकत घेतला होता. घरी आल्यानंतर जेव्हा मुलाने ते खाण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला काहीतरी कठीण आणि विचित्र लागले. आई-वडिलांनी रोल फोडून पाहिल्यावर त्यामध्ये गुटख्याची पुडी अडकलेली दिसली. ही बाब लक्षात येताच त्यांनी लगेचच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.