शरद पवारांना मोठा धक्का! पश्चिम महाराष्ट्रात 'तुतारी'ला खिंडार; समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये
Kolhapur Politics: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला असून, प्रभावशाली नेते समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात बांधणी सुरू केली असतानाच, घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. समरजितसिंह घाटगे यांनी काही काळापूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.
Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द
घाटगे यांच्या या निर्णयामुळे कागल मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे. “समरजितसिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा धक्का मानला जात असून, यामुळे ‘महाविकास आघाडी’च्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.”
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठी देत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र अवघ्या काही काळातच ‘तुतारी’ सोडून पुन्हा ‘कमळ’ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माझ्या मूळ पक्षात परतलो असून यामुळे कोणालाही अडचण होण्याचे कारण नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे, कागलमधील त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्याशी असलेले मतभेद आता संपल्याचेही त्यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आमच्यातील वाद मिटवला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा समन्वय दिसून आला आहे, असे सांगत त्यांनी भविष्यात मुश्रीफांसोबत एकत्र काम करण्याचे संकेत दिले आहेत.
धक्कादायक! अशोक खरातच्या फार्म हाऊसवर जिल्हा परिषदेची उधळपट्टी, शासकीय राजवटीत ‘मुक्त उधळण’
या सोहळ्यात समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राजे अखिलेशसिंह घाटगे आणि राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनीही अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कागलमधील असंख्य कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतल्याने स्थानिक पातळीवर पक्षाची ताकत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घाटगे यांच्या या घरवापसीमुळे कागलसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






