पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची संकल्पना
‘अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ
मधमाश्यांच्या पंखांवर रंगतेय शहराच्या पर्यावरणाचे भविष्य
सुनयना सोनवणे /पुणे: एका बाजूला टेरेस गार्डनमध्ये फुलणारी फुले आणि दुसऱ्या बाजूला त्या फुलांवर येणाऱ्या मधमाश्या… शहरांमध्ये आता केवळ भाजीपाला उगवण्यापुरते शहरी बागकाम मर्यादित राहिलेले नाही, तर त्यापुढे जाऊन ‘अर्बन बीकीपिंग’ अर्थात शहरी मधमाशी पालनाची संकल्पना आता आकार घेत आहे. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात ही संकल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. कारण मधमाश्या केवळ मध देत नाहीत, तर त्या शहरातील झाडे, फुले आणि संपूर्ण जैवविविधतेचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
गच्चीवर मधपेटी, घरचा मध… पण शास्त्रशुद्ध पद्धतीने!
टेरेस गार्डनप्रमाणे घराच्या गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत मधमाशी पालन करता येते. याला अर्बन बीकीपिंग म्हणतात. मात्र त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षित व्यवस्थापन आवश्यक आहे. शहरांमध्ये प्रामुख्याने भारतीय मधमाशी (एपिस सेराना इंडिका) आणि युरोपियन मधमाशी (एपिस मेलीफेरा), पोळ्याची माशी (स्टिंगलेस बी) या प्रजातींचे पालन केले जाते. भारतीय मधमाशी स्थानिक हवामानाशी जुळवून घेणारी असल्याने शहरी भागासाठी तुलनेने उपयुक्त मानली जाते. मात्र मधमाशी पालन म्हणजे केवळ पेटी ठेवणे नव्हे. मधमाश्यांच्या वर्तनाचा अभ्यास, पोळ्याची देखभाल, रोग नियंत्रण, मध काढण्याची योग्य पद्धत आणि सुरक्षितता याची माहिती असणे आवश्यक आहे.
पुण्याची विशेष ओळख : केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था
अर्बन बीकीपिंगसाठी पुण्याला एक मोठी जमेची बाजू आहे. शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही आशिया खंडातील मधमाशी पालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संशोधन संस्था आहे. संस्थेत ५ ते ३० दिवसांचे विविध अभ्यासक्रम घेतले जातात. मधमाशी पालन, मध उत्पादन, परागीकरण व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे पुणे हे मधमाशी पालन प्रशिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
Pune News : जांभोरी गाव होणार ‘मधाचे गाव’; २० बचत गटांतील आदिवासी महिलांचा स्त्युत्य उपक्रम
मधमाश्या म्हणजे शहराच्या पर्यावरणाचा आरसा
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेनुसार जगातील सुमारे ७५ टक्के अन्नपिके परागीकरणावर अवलंबून आहेत. फळे, भाजीपाला, तेलबिया आणि अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी मधमाश्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र वाढते काँक्रीटीकरण, वृक्षतोड, कीटकनाशकांचा वापर आणि हवामान बदलामुळे मधमाश्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरी भागात फुलझाडे वाढविणे आणि ‘बी-फ्रेंडली’ परिसर तयार करणे आवश्यक झाले आहे.
‘मधुर क्रांती’ला सरकारी पाठबळ
केंद्र सरकारने राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान अंतर्गत २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भारतामध्ये सध्या सुमारे १.४ लाख मेट्रिक टन मधाचे उत्पादन होते. २०२३-२४ मध्ये भारताने १.०७ लाख मेट्रिक टन मधाची निर्यात केली असून, जागतिक मध निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
शहरांसाठी ‘बी-फ्रेंडली’ नियोजनाची गरज
अर्बन बीकीपिंगला प्रोत्साहन देताना काही बाबी महत्त्वाच्या आहेत –
– स्थानिक फुलझाडांची लागवड
– रासायनिक कीटकनाशकांचा कमी वापर
– गच्चीवरील बागांमध्ये मधमाश्यांसाठी अनुकूल वनस्पती
– नागरिकांना मधमाश्यांबाबत जनजागृती
– प्रशिक्षित व्यक्तींकडून मधमाशी पालन
उंच बिल्डिंग, टेरेस गार्डन, फुलांची विविधता आणि सहज पाणी उपलब्धता मुळे सध्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मधमाशांची पोळे सहज पाहायला मिळतात. मधमाशांचे संरक्षण करण्यासाठी मधुमक्षिका पालनाला प्रोत्साहन देणे, मधमाशी-अनुकूल फुलझाडांची लागवड करणे आणि पेस्ट कंट्रोल किंवा पारंपरिक पद्धतींनी मधमाशा न मारणे आवश्यक आहे. डंखहीन मधमाशा पाळीव स्वरूपात टेरेस शेतीत, फ्लॅटच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ, फार्महाऊसमध्ये, बंगल्यात तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात ‘बी पार्क’ उभारून सहजपणे जोपासता येतात.’ तसेच शहरात एसीचा वेंट आउटलेट व्हाईट सिमेंट ने बंद करायला हवा जेणेकरून मध तिथून रुम मध्ये जाणार नाहीत.’
– अमित गोडसे, बी मॅन ऑफ इंडिया, मधमाशी संवर्धक आणि संस्थापक – बी बास्केट
‘अर्बन बीकीपिंग ही केवळ मध मिळविण्याची पद्धत नाही, तर शहराला निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे.
पुणे शहरातली नारळ, जांभूळ, चिंच, गुलमोहोर अशी झाडे मधासाठी उपयुक्त ठरतात. आपल्या परिसरात कोणत्या प्रकारची झाडे आहेत, त्याचे प्रमाण किती आहे यावरून किती कॉलनी (मधमाशांच्या पेट्या) ठेवता येतील हे ठरते. ट्रायगोना माशी ही किचन गार्डन साठी ठेवू शकता. साधारणपणे ७ मजली उंची पर्यंत अर्बन बीकीपिंग करता येते.
– सलील भागवत, मधमाशी संवर्धक आणि प्रशिक्षक






